इराणचा $100 मिलियन किमतीच्या अमेरिकन F-35 जेटवर हल्ला

0
2


दि.२०(पीसीबी) -इराणकडून अमेरिकेच्या अत्याधुनिक आणि सुमारे १०० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या F-35 लाइटनिंग II लढाऊ विमानावर हल्ला केल्याचा मोठा दावा करण्यात आला असून, या घटनेमुळे अमेरिका-इराण संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे. इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये हवाई कारवाईदरम्यान अमेरिकन F-35 विमानाला लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, या हल्ल्यामुळे विमानाला गंभीर फटका बसला आणि त्याला तातडीने आपत्कालीन लँडिंग करावी लागली. दरम्यान, यूएस सेंट्रल कमांडकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान इराणवरील एका महत्त्वाच्या लष्करी मोहिमेदरम्यान हल्ल्याला सामोरे गेले, मात्र पायलटच्या कौशल्यामुळे विमान सुरक्षितपणे उतरवण्यात यश आले असून पायलटची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

इराणकडून विमानाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा केला जात असला, तरी त्या नुकसानीची नेमकी तीव्रता किती आहे याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान असलेल्या F-35 सारख्या विमानावर हल्ला झाल्याचा दावा हा लष्करी दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडाली आहे. सध्या दोन्ही देशांकडून एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असून, या संघर्षाचे पडसाद जागतिक सुरक्षेवर आणि राजकीय परिस्थितीवर उमटण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.