राज्यात गॅस टंचाई, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार? मंत्री छगन भुजबळ यांची मोठी घोषणा

2 Min Read

दि.१७(पीसीबी)-तणावामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यातील अनेक उद्योग, हॉटेल व्यावसायिक, टपरी चालक तसेच सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. गॅस एजन्सीबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत असून, वेळेत गॅस मिळत नसल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. हॉटेल व्यावसायिकांसह घरगुती वापरासाठी इंडक्शन, विद्युत शेगडी, चूल तसेच सौर ऊर्जेवरील साधनांचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.

सरकारकडून गॅस तुटवडा नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच दिसून येत आहे. एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याने पर्याय म्हणून केरोसिन (रॉकेल) वितरणाचा विचार राज्य सरकार करत आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत यासंदर्भात घोषणा केली असून, पेट्रोल पंपांवरून केरोसिन वितरण करण्याबाबतही चाचपणी सुरू आहे. पूर्वी रॉकेलच्या काळाबाजारामुळे त्याचा वापर कमी करण्यात आला होता, मात्र सध्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा पर्याय पुन्हा पुढे येत आहे.

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये गॅस टंचाईचे चित्र अधिक गंभीर असून नागरिकांना सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींना केवळ OTP प्रणालीद्वारे सिलेंडर वितरण करण्याचे तसेच ९६ तासांच्या आत पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गोदाम किंवा इतर ठिकाणांहून थेट गॅस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काळाबाजार सुरू असून नागरिकांना ४०० रुपयांपर्यंत अधिक दराने गॅस घ्यावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

दरम्यान, गॅस दरवाढ आणि टंचाईच्या निषेधार्थ नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन पार पडले. यावेळी सरकारला गॅस टंचाईबाबत जाब विचारत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत गॅस टंचाई, वाढता काळाबाजार आणि पर्यायी इंधनाचा शोध या तिन्ही गोष्टींमुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून या संकटावर प्रभावी तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article