अभय योजनेचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन
पिंपरी, दि. १४ मार्च २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात दि. १ एप्रिल २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ८०० कोटी ८४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची अंमलबजावणी तसेच कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन सुविधांमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर रवि लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या थकबाकीदारांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेमार्फत अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास दि. १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विलंब दंडाच्या रकमेवर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे १७ दिवस शिल्लक राहिले आहेत.
महापालिकेमार्फत नागरिकांना या योजनेची माहिती देण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी – बिगरनिवासी, औद्योगिक व इतर एकूण ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ५ लाख ७५ हजार ३२८ मालमत्ताधारकांनी आतापर्यंत मालमत्ता कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येत असून शहरातील नागरिकांकडून कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर कर संकलन विभागामार्फत नियमानुसार जप्ती व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.













































