प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव यांच्या कार्यात! – डॉ. श्रीपाल सबनीस

0
2

यशवंत – वेणू गौरव सोहळा संपन्न

दि.१३(पीसीबी)-आजच्या प्रगत महाराष्ट्राची पाळेमुळे यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्ट्या कार्यात आहेत!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी काढले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने राष्ट्रपतींचे धोरणात्मक सल्लागार डाॅ. देवानंद शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ. अनिता शिंदे या दांपत्याला यशवंत – वेणू पुरस्कार प्रदान करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच नगरसेविका शिवानी नरळे यांना वेणूताई चव्हाण युवती पुरस्कार, आर. के. डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्सचे संचालक राजाराम मलघे यांना यशवंतराव चव्हाण उद्योगभूषण पुरस्कार आणि ब्राईट इंडस्ट्रीजचे संचालक वसंत गायकवाड यांना यशवंतराव चव्हाण उद्योगविभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘यशवंतराव यांची भूमिका संविधानवादी होती. त्यांनी सामाजिक समतेचा विचार प्रत्यक्षात आणला. सुसंस्कृत अन् आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण होय!’ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, ‘यशवंतराव यांनी ब्राह्मण – ब्राह्मणेतर वादावर समन्वयवादी भूमिका घेऊन सामाजिक क्रांती केली. कसेल त्याची जमीन हा कायदा करून समानतेचा न्याय प्रस्थापित केला. शिवाजीमहाराज यांच्या स्वराज्याची खरी ओळख त्यांनी जगाला करून दिली!’ सुदाम भोरे यांनी यशवंतराव यांचे कार्य आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त केले.

यशवंत – वेणू पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. देवानंद शिंदे यांनी, ‘तंत्रज्ञानाला मानवी मूल्यांची चौकट देणे गरजेचे आहे!’ असे विचार व्यक्त केले. डॉ. अनिता शिंदे यांनी, ‘मेहनत आणि प्रामाणिकपणा यांचा नेहमीच सन्मान होतो!’ अशी भावना व्यक्त केली. महापौर रवी लांडगे यांनी, ‘यशवंतराव हे सागरासमान आहेत तर त्यांचे कार्य हिमालयाएवढे महान आहे!’ अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

वृक्षपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले तसेच पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव इतिहासाचं एक सोनेरी पान’ या विषयावर व्याख्यान दिले. कुमार खोंद्रे यांनी ‘यशवंतगीत’ आणि ‘पिंपरी – चिंचवडची लावणी’ या काव्यरचना सादर केल्या. अरुण गराडे, इंद्रजित पाटोळे, राजू जाधव, प्रतिमा काळे, प्रा. प्रभाकर दाभाडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर वाघोले यांनी आभार मानले.