वैजापूर जलसंधारण विभागाचा अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक

0
123

दि.०९(पीसीबी)- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत वैजापूर जलसंधारण विभागातील वर्ग-1 अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. निखिल अशोक कवाडे (वय 33) असे अटक करण्यात आलेल्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराची टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स एजन्सी असून त्यांनी आपली बोलेरो गाडी वैजापूर जलसंधारण विभागाला मासिक भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र गाडीचे भाड्याचे प्रलंबित बिल पुढे पाठवण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली होती.

सरकारी कामासाठी लाच मागितल्याने संतप्त झालेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने 7 मार्च 2026 रोजी सापळा रचून कारवाई केली.

पडताळणी दरम्यान आरोपी अधिकाऱ्याने 10 हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र तडजोडीनंतर 7 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराने ऑनलाईन 7 हजार रुपये ट्रान्सफर करताच एसीबीच्या पथकाने निखिल कवाडे याला ताब्यात घेतले.

या कारवाईत आरोपीकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातील डिजिटल व्यवहारांची तपासणी सुरू आहे. आरोपीच्या घराची झडतीही घेण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे पुढील तपास करत आहेत.