पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

0
25

दि.०८ (पीसीबी) – पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे पुणे विद्यापीठ चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता.कोरोना काळापासून सुरू असलेले हे काम पूर्ण झाल्यानंतर आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या उद्घाटन सोहळ्याला प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि महापौर मंजुषा नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे विद्यापीठ चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक मानला जातो. त्यामुळे या उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे पूर्वीचा उड्डाणपूल पाडण्यात आला होता. त्यानंतर हा नवीन उड्डाणपूल उभारण्यात आला असून काही महिन्यांपूर्वी एक बाजू सुरू करण्यात आली होती. आता दुसरी बाजूही वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याने प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे.