रिकाम्या तिजोरीच्या चाव्या भाजप कोणाच्या हातात देणार

bpcauthor bpcauthor
2 Min Read

पिंपरी, दि. २४ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाच्या हाती जाणार याचा फैसला (बुधवारी २५ फेब्रुवारी) होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया शनिवारी (२८ फेब्रुवारी) रोजी होणार आहे. स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व असल्याने अर्ज दाखल करताच कोण अध्यक्ष होणार हे स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात निवडणूक होणार आहे. यासाठी स्थायी समितीच्या सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी दिली.

स्थायी समितीमध्ये भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे चार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचा एक सदस्य आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेले अभिषेक बारणे, संदीप कस्पटे आणि बाबासाहेब त्रिभुवण यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.

हेही वाचा
लॅपटाॅप, मोबाईल, हेडफोन, एलसीडी आणि सुट्टे भागांची पुण्यात सर्वाधिक आवक… कारण काय?
स्थायी समितीत भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी

सत्ताधारी भाजपने धक्कातंत्र अवलंबित पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या सात चेहऱ्यांना संधी दिली आहे. सात महिलांना स्थायी समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे, संदीप कस्पटे आणि बाबासाहेब त्रिभुवन यांच्यात चुरस असणार आहे.

स्थायी समितीचे सदस्य

अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन (भाजप), सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सुलभा उबाळे (शिवसेना)

Share This Article