अजितदादांच्या आठवणी जतन करण्यासाठी सुनील मुसळे यांच्याकडून विशेष उपक्रमाचे आयोजन

0
2

दि.१८(पीसीबी)-महाराष्ट्राच्या राजकारणात “कामाचा माणूस” म्हणून ओळख निर्माण करणारे आदरणीय अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासातील अमूल्य क्षण जतन करण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. छायाचित्रे आणि व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा समृद्ध डिजिटल दस्तऐवज तयार करण्याचा हा प्रयत्न असून कार्यकर्ते, सहकारी आणि नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ अजितदादांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करत जनतेशी जिव्हाळ्याचं नातं जपलं. पहाटेपासून सुरू होणारी त्यांची कामाची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरू असायची. विकासासाठीची तळमळ, कार्यकर्त्यांप्रती आत्मीयता आणि जनतेसाठीची बांधिलकी यामुळे त्यांच्या कार्यशैलीने महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला. या सर्व आठवणी इतिहासात जतन व्हाव्यात, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आयोजकांनी आवाहन केले आहे की, ज्यांच्याकडे अजितदादांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण दर्शवणारी छायाचित्रे किंवा व्हिडिओ (एचडी गुणवत्तेत) उपलब्ध असतील त्यांनी ती पाठवावीत. यासाठी [[email protected]](mailto:[email protected]) हा ई-मेल आयडी आणि८८७९८८७००९ (श्री. अभिषेक)* हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे अजितदादा पवार यांच्या कार्याचा सविस्तर दस्तऐवज तयार होणार असून त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. राज्यभरातील तसेच राज्याबाहेरील त्यांच्या समर्थकांना त्यांच्या आठवणी पुन्हा अनुभवता याव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.“चला, आपण सर्वजण मिळून आदरणीय दादांच्या आठवणी जतन करूया आणि त्यांच्या स्मृतींना चिरकाल जिवंत ठेवूया,” असे आवाहन विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांनी केले आहे.