दि.१८(पीसीबी)-माझ्या पत्रकार परिषदेनंतर तपास यंत्रणांच्या तपासाला वेग आला. त्यानंतर इतर नेते देखील पत्र द्यायला लागले, ही चांगली गोष्ट आहे. अजित पवारांचा अपघात आहे की घातपात हे मी मांडलं होतं. तसेच ब्लॅक बॉक्सबाबत मी एक विधान केलं होतं. ते देखील आता खरं होतंय. ब्लॅक बॉक्स जळाल्याचं आता सांगण्यात येत आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले. तसेच आमच्यासारखा बिना बॅकग्राउंडचा, बिना सरकारमधील व्यक्ती एवढी माहिती गोळा करू शकतो मग सत्तेतील लोकांना हे का शक्य नाही?, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला.
अजितदादांच्या विमानाचा स्फोट का झाला?
अजितदादांच्या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये अपघातानंतर मोठे स्फोट झाल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतंय. विमान पडल्यानंतर काही वेळाच्या अंतराने स्फोट झाले होते. त्या विमानात अधिकचे इंधन होते. विमानाच्या पंखामध्ये आणि आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते, यामुळे अपघातानंतर वारंवार स्फोट झाले, असा दावा रोहित पवारांनी केला. तसेच वॉशरूम जवळ हे इंधन टँक होते. तिथेच ब्लॅक बॉक्स असतो, असंही रोहित पवार म्हणाले. सध्या ब्लॅकबॉक्स जळला असं सांगत असतील. तर ते केवळ मॅनिप्युलेशन सुरू आहे, असा आमचा आरोप आहे. आम्ही आज बोलणार होतो म्हणून काल यांनी काही माहिती समोर आणली, असंही रोहित पवारांनी सांगितले.
रोहित पवारांचा विमान कंपनीबाबत खळबळजनक दावा-
CVR चा सरकारी नियम आहे की 2 तास संभाषण रेकॉर्ड झालं पाहिजे या विमानातील केवळ 30 मिनिटं होतं. हे विमान आधी खरेदी करण्यात आलं आणि त्यानंतर रजिस्टर करण्यात आलं. किती प्रकारे गैर प्रकार सुरू आहेत हे आपल्याला दिसत असेल. या विमानाचे 5 हजार तास उड्डाण करण्याचे तास होते. अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान 8 हजार तासांपेक्षा जास्त फ्लाय झाल्याची शक्यता आहे, असंही रोहित पवारांनी सांगितले. पायलट कपूर आणि रोहित सिंग हे अनधिकृत दोन प्रकारचे विमान चालवत होते. याचे पुरावे देखील आहेत. जितका तपास पुढे जाईल तितकी आणखी सत्यता समोर येईल. रोहित सिंग नावाच्या पायलटचे 2 वेळा दारू पिलेला असल्यामुळे लायसन रद्द झालं होतं. कॅप्टन कार्लोस हा व्हेंझुयलाचा रहिवासी आहे. भारतात प्रवासी म्हणून प्रवेश करतो आणि इकडे विमान चालवतो. मुळात अशी परवानगी नाही, असा खळबळजनक दावाही रोहित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.
विमान अपघात तपास ब्युरोने काय म्हटलं?
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विमान अपघात तपास ब्युरोकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. अजित पवारांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. हे बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरला नुकसान झालं आहे. त्यापैकी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरोला यश मिळालं आहे. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील अधिस्वीकृत प्रतिनिधींची मदत मागितलेली आहे. तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅंडर्डनुसार पुरावेनिष्ठ तपास करत अशल्याचं सांगण्यात आलं आहे.




































