विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कुटुंबीयांची जमीन खरेदी चर्चेत

0
4

अलिबाग, दि. १८ : जमीन मोजणी वादाच्या चित्रफितीनंतर विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर यांच्या अलिबाग तालुक्यातील जमीन खरेदीच्या झपाट्याची चर्चा उघडपणे होऊ लागली. नार्वेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रांवरून स्पष्ट होत असून राहुल यांच्या पत्नी सरोजिनी आणि बंधू मकरंद यांनी २०२२ पासून अलिबाग तालुक्यात जवळपास ६० एकर जमीन खरेदी केल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते.

विशेष म्हणजे, २०२० ते २०२३ या काळात प्राप्तिकर विवरणपत्रात काही हजारांचे उत्पन्न दाखवणार्‍या नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मात्र एकदम ९९ लाख उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र सादर केल्याचे आढळते, तर २०१७च्या महापालिका निवडणुकीत सहा कोटींची मालमत्ता ‘दाखवणार्‍या’ मकरंद नार्वेकर यांची २०२४ साली एकूण मालमत्ता एकदम १२४ कोटींवर पोहोचल्याचे स्पष्ट होते.

शिवसेना पक्षफुटीमुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलै २०२२मध्ये राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष बनले. नंतर २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपप्रणीत महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी कायम ठेवली. गेल्या आठवड्यात अलिबाग तालुक्यातील एका जमिनीच्या मोजणीवरून सुरू असलेल्या वादाच्या चित्रफितीत नार्वेकर दिसले. त्या वेळी बळजबरीने जमीन खरेदी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यावर नार्वेकर यांचा खुलासा होता ‘मी दोन शेजार्‍यांमधील वाद मिटवण्यासाठी तेथे गेलो.’

दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार असलेल्या नार्वेकर यांचे बंधू मकरंद हे कुलाबा परिसरातून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नार्वेकर कुटुंबाचे मूळ गाव अलिबाग तालुक्यातील चोंढी. या कुटुंबाने २०२२ पासून अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे. खुद्द राहुल नार्वेकर यांच्या नावावर अलीकडच्या काळातील जमीन खरेदीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात नाही. मात्र याच प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांच्या नावे अलिबाग तालुक्यातील सोगाव, म्हात्रोळी, झिराड, झिराडपाडा या भागांत वेगवेगळ्या व्यवहारांत ४९ एकर जमीन खरेदीची नोंद आहे. या जमिनींची खरेदी किंमत ७५ कोटी २४ लाख रुपयांपेक्षा जास्त असावी.

केवळ सरोजिनी नार्वेकरच नव्हे तर राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद यांनीही अलिबाग तालुक्यात जमीन खरेदीचा सपाटा लावल्याचे दिसते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मकरंद नार्वेकर यांनीही झिराड, झिराडपाडा, धोकवडे, किहिम, सासवणे, मापगाव, म्हात्रोळी या गावांच्या परिसरात १४ एकर जमीन खरेदी केल्याची नोंद आहे. या जमिनी ऑक्टोबर २०२२ ते नोव्हेंबर २०२५ या काळात खरेदी केल्याची नोंद असून त्यांची खरेदी किंमत ७० कोटींपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

नार्वेकर कुटुंबीयांनी खरेदी केलेल्या जमिनी या प्राधान्याने उत्तर अलिबागमधील आहेत. दक्षिण मुंबईहून सागरी मार्गाने अवघ्या एक ते सव्वा तासाच्या अंतरावर असलेल्या या भागाकडे फार आधीपासूनच नामांकित उद्योगपती, सिनेसृष्टीतील कलावंत, खेळाडू यांचा ओढा आहे. या ठिकाणी शेतघरे किंवा आलिशान बंगले बांधून सुट्टीनिमित्त राहायला येणार्‍या ‘सेलिब्रिटीं’ची संख्या लक्षणीय आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलांचे प्रकल्पही उभे राहत आहेत. त्यामुळे या परिसरात जमिनींचे दर भरमसाट वाढत आहेत. असे असताना नार्वेकर कुटुंबीयांनी येथे जमीन खरेदीत सातत्य राखले आहे.

राहुल नार्वेकर यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी सरोजिनी नार्वेकर यांच्या व्यवसाय वा नोकरीचा तपशील आढळत नाही. मात्र २०२०मध्ये त्यांनी सादर केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात त्यांचे उत्पन्न १३९९० रुपये इतके दाखवण्यात आले आहे. त्यानंतर २०२१, २०२२, २०२३ या आर्थिक वर्षातील विवरणपत्रातही त्यांचे उत्पन्न १२ ते ३८ हजारांच्या दरम्यान असल्याचे दिसते. असे असताना २०२४ मध्ये मात्र सरोजिनी नार्वेकर यांचे उत्पन्न ९९ लाख ४९ हजार ६८० इतके झाले. मकरंद नार्वेकर यांनी २०१७च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सहा कोटी ३२ लाखांच्या आसपास स्थावर आणि जंगम मालमत्ता जाहीर केली. पण त्यानंतर अवघ्या आठ वर्षांत त्यांची एकूण मालमत्ता १२४ कोटी ४५ लाखांवर पोहोचली. यात मालकीच्या जमिनींचे मूल्यच ८० कोटींच्या वर आहे.

यात लपवाछपवी काहीही नाही. अलिबागमध्ये आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत. आजोबांच्या काळापासूनच आम्ही अलिबागमध्ये जमिनी विकत घेतल्या आहेत, विकल्या आहेत. जसे एके काळी नवी मुंबईतील जागांना मागणी होती, मग उरण, उलवे, करंजा येथील जागांना मागणी वाढली. तशी आता अलिबागमधील जागांची मागणी वाढली आहे. टाळेबंदीनंतर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात जागा घेणे, सेकंड होमसाठी गुंतवणूक करण्यात वाढ झाली आहे. त्यात काही गैर केलेले नाही. केवळ नार्वेकरांच्या संपत्तीत वाढ झाली आहे असे नाही असे भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी म्हटले आहे.

‘कोणतीही बेनामी मालमत्ता नाही’
विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर यांनी जमीन खरेदीबाबत आपल्या कुटुंबाविषयी हेतुपुरस्सरपणे चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा केला. ‘तीन पिढ्यांपासून आमचा परिवार व्यवसायात आहे. आम्ही घेतलेल्या जागांविषयी जे बोलतात त्यांनी आम्ही कोणती जागा विकून कोणती जागा घेतली, हे पाहिले आहे का? आम्ही कोणतीही संपत्ती कधीही लपवलेली नाही. उत्पन्नाचे साधन लपवलेले नाही. जी जमीन आहे ती आमच्या नावावर आहे, सर्व कागदोपत्री आहे. कोणताही गैरप्रकार केलेला नाही. आम्ही रीतसर प्राप्तिकर तसेच अन्य कर भरत आहोत. आमच्या संपत्तीविषयी निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र देत असतो. त्यामुळे कोणतीही बेनामी मालमत्ता आमच्याकडे नाही,’ असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

कर्जांची देवाणघेवाण
’राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये कर्जांची देवाणघेवाण झाल्याचीही नोंद आहे. राहुल नार्वेकर यांनी सरोजिनी यांना ३ कोटी ४२ लाखांचे कर्ज दिल्याची नोंद आहे.

’मकरंद नार्वेकर यांनी राहुल नार्वेकर यांना ७ कोटी १७ लाखांचे कर्ज दिल्याचे नमूद आहे. मकरंद नार्वेकर यांनी आपल्या वहिनी सरोजिनी यांना ३१ कोटी ६६ लाखांचे कर्ज दिल्याचे नोंद आहे.