अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी नागरी उड्डाण मंत्रालयाने केला अधिकृत खुलासा

0
2

दि.१७(पीसीबी)-नागरी उड्डाण मंत्रालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी AAIB कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीबाबत कोणतीच प्राथमिक माहिती समोर येत नसल्याने आमदार रोहित पवारांसह सर्वांनी संताप व्यक्त केलाय. तसंच, या अपघातात ब्लॅक बॉक्स जळल्याचे वृत्तही अनेक माध्यमांनी प्रसारित केले. त्यामुळे रोहित पवारांनी या अपघातात घातपाताचाच संशय अधिक व्यक्त केलाय. यामुळे तपासकार्याबाबत शंका व्यक्त केली जात असल्याने नागरी उड्डाणमंत्रालयाने याबाबत आज परिपत्रक जारी केलंय. त्यात, विमान अपघात चौकशीबाबत माहिती देण्यात आली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने काय म्हटलंय?
नागरी उड्डाण मंत्रालायने म्हटलंय, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या Learjet ४५ विमान VT-SSK च्या अपघाताची विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) सविस्तर चौकशी करत आहे. विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. अपघातादरम्यान दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर बराच काळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले.”

L3 कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) AAIB फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. हनीवेलद्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) ची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू आहे. यातील डेटा पुन्हा मिळावा याकरता विशेष मदतीसाठी उत्पादकाच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधीशी संपर्क साधण्यात आला आहे, असंही नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटलं आहे.

विमान अपघात तपास ब्युरो सर्व तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत आहे जेणेकरून सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि पुराव्यावर आधारित तपास केला जाईल. ब्युरो पारदर्शकतेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि तपासाच्या योग्य टप्प्यावर पुढील माहिती देण्यात येईल, असंही मंत्रालयाने म्हटलंय. तसंच, या तपासाबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.