भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने केली खरेदी; लिलावात तब्बल 47 लाख मोजले

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि . ३० ( पीसीबी ) – नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे. मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे. लंडनमध्ये झालेल्या लिलावात राज्य सरकारने ही तलवार 47.15 लाख रुपयांनी खरेदी केली. 

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत विकास खरगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ही ऐतिहासिक तलवार खरेदी करण्यात आली. अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 

तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व

रघुजी भोसले यांची युद्धनीती आणि शौर्य पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी १७४५ मध्ये बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल, ओडिशापर्यंत केला होता. 

त्यांनी चांदा, छत्तीसगढ, संबळपूर यासह दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे.

Share This Article