आरोपीच्या दाव्याने प्रकरणाला वेगळं वळण :

2 Min Read

दि . २८ ( पीसीबी ) – पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर मुख्य आरोपी दत्ता गाडे याला अखेर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र, अटकेनंतर पोलिसांसमोर दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. गाडेने बलात्काराच्या आरोपांचे खंडन करत संबंध सहमतीने झाले असल्याचा दावा केला आहे.

अटक झाल्यानंतर आरोपी दत्ता गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान दत्ता गाडे पोलिसांसमोर हमसून रडल्याची माहिती मिळाली आहे.
“माझं चुकलंय, मी पापी आहे,” असं म्हणत त्याने पश्चात्ताप व्यक्त केला. मात्र, त्याने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप फेटाळून लावत संबंध सहमतीने झाले होते, असा दावा केला आहे. यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दत्ता गाडेच्या या दाव्यामुळे पोलिसांपुढे नवा प्रश्न उभा राहिला आहे. पीडित तरुणी आणि आरोपी आधीपासून ओळखीचे होते का? तसेच, जर संबंध संमतीने झाले होते, तर पीडितेने जबाबात बलात्काराचा आरोप का केला? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून आरोपीच्या शोधात असलेल्या पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजता शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला अटक केली. दत्ता गाडेचा मोबाईल बंद असल्याने शोध मोहिमेत अडथळा येत होता. मात्र, अखेर पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतलं.

Share This Article