- नितीन पवार यांचे चार शब्द ! युवा नेतृत्वासाठी !
काही कामानिमित्त मला पार्थदादा पवार यांना जवळून पाहता आलं, अनुभवता आलं. ज्या पद्धतीनं २०१९ नंतर त्यांची इमेज करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या सर्व विरुद्धार्थी त्याची पर्सनालिटी असल्याचं मला जाणवलं म्हणून मी लिहायचं ठरवलं.
एका मोठ्या नेत्याचा मुलगा म्हणून नाही तर एक तडफदार युवक माझ्या पिढीचं प्रतिनिधित्व करत आहे म्हणून त्यांच्याबद्दल डोळसपणे लिहतोय.सामान्य तरुण म्हणून जे अनुभवता आलं ते मांडतोय.
त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या ५ वर्षात स्वतःला डेव्हलप केलं आहे ते खरोखरचं प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी आहे.
विषय नेपोटिझमचा नाही, तर..
भाजपाच्या पंकजाताई मुंडे, नितेशजी राणे, पुनमजी महाजन, काँग्रेसचे राहुलजी गांधी ते अमितजी देशमुख अन सोलापुरच्या प्रणितीताई शिंदे, शिवसेनेचे आदित्यजी ठाकरे (उबाठा) आणि श्रीकांतजी शिंदे (शिंद गट), राष्ट्रवादीचे रोहितदादा पवार अन रोहित आर.आर.पाटील, मनसेचे अमितजी ठाकरे, वंचितचे सुजातजी आंबेडकर असतील. (हेच जर कलाकारांच्या बाबतीत बोलायचं तर प्रत्येक हिरोच्या मुलांना आपण सर्वांनी स्विकारलं आहेच की. मग, तेंव्हा आपला नेपोटिझम कुठे असतो.)
सो, आज अशा सर्व पक्षीय सर्व राजकीय नेत्यांच्या मुलांना आपण स्विकारलं आहेच की. मग, पार्थ पवार यात का नाहीत.?
असा प्रश्न मला अनेकदा पडायचा, पार्थ पवार राजकीय क्षेत्रात सक्रिय का नाहीत किंवा ते कुठे आहेत?, ते करतात काय?. असाच माझ्यासारखा प्रश्न कदाचित अनेकांना पडला असेल किंवा पडत असेल.
मागील काही दिवसातील अजितदादांचे दिल्ली दौरे पाहिले की पार्थदादा सावलीसारखे हमखास अजितदादांच्या सोबत दिसतात. बारामती विधानसभा निवडणूकीच्या सांगता सभेवेळी ते एका कोप-यात टु व्हिलरला टेकून सभा ऐकत होते. हा त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपातला presence ठीक आहे. पण त्यापलिकडे ही ते खुप काही करतात, हे लक्षात आलं.
तर, सांगायचा मुद्दा असा की, अलीकडच्या काळात अजितदादांच्या जीवनातील अनेक निर्णयांमध्ये पार्थदादा यांची भूमिका महत्वपुर्ण आहे. अजितदादांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे अनेकांना राजकीय आत्महत्या वाटत होती. अजितदादा २०२४ नंतर संपतील असाच कयास सर्वांनी बांधला होता. पण, ज्या जोरदार पद्धतीनं अजितदादा यांनी कमबॅक केलं आहे, ते लाजवाब आहे. पण, अजितदादांच्या या यशात पार्थदादा पवार यांचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. स्टेजवर न थांबता पार्थदादा यांनी पडद्याच्या मागे राहून बरेच डावपेच आखले आणि त्यापैकी अनेक सक्सेस ठरले सुद्धा.
विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेंव्हा ५६ पैकी ४१ जागा जिंकल्या. तेंव्हा, डिझाईन बॅाक्स कंपनीचे नरेश अरोरा यांच्या अनेक चॅनेल्सनी मुलाखती घेतल्या. पक्षातील इतर अनेकांना हिरो बनवण्यात आलं. पण, डिझाईन बॅाक्स कंपनीची निवड करणे, त्यानंतर निवडणूक कॅम्पेनिंगमधील प्रत्येक गोष्ट फायनल करणे, प्री व पोस्ट इलेक्शन कॅम्पेनिंग हे सर्व पार्थदादा पवार यांच्या नेतृ्त्वाखाली झाले होते. पक्षाचे उमेदवार फायनल करण्यात महत्वाचे इनपुटस त्यांनी पक्षाला दिली होती. खरंतर शोधपत्रकारिता करणा-या चॅनेलच्या पत्रकार मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयानंतर पार्थदादा पवार यांची मुलाखत करायला पाहिजे होती, त्यातून पक्षाची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, प्रचारात नव्यानेच राबविलेल्या गोष्टी, पक्षाची बांधणी आणि पार्थदादा यांची आगळीवेगळी इमेज नक्कीच महाराष्ट्राला पाहता आली असती.
विधानसभेला मित्रपक्षानी प्रामाणिकपणे काम केलं असते तर कदाचित अजितदादांच्या पक्षाचा ४१ हा आकडा ५० च्या पुढ गेला असता. पराभूत उमेदवारांचा अभ्यास केल्यावर निश्चित लक्षात येईल. गेल्या वर्षभरापासून ते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या येत होत्या. काहींनी त्यांना राज्यसभा मिळाली नाही म्हणून ते नाराज असल्याच्या बातम्या ही केल्या. परंतू, लोकसभा निवडणुकीनंतर खरंच जेंव्हा, राज्यसभेच्या दोन रिक्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेल्या आल्या. त्यावेळेस त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत खासदारकी मला नको, आईला द्यावी अशी भूमिका पक्षाकडे मांडली. तत्कालीन राजकीय परिस्थितीमध्ये आपल्या आईचा पराभव झाला. स्वतःच्या पोलिटिकल करिअरचा अजिबात विचार न करता, आपल्या आईला त्यांनी खासदार करुन दाखवलं. आपल्या आई-वडिलांसाठी सर्वस्व देणं हे एक समजुतदार मुलगाच करु शकतो.
आज घडीला राज्यात सर्वाधिक काम करणारा नेता कोण असेल तर तो नेता म्हणजे अजितदादा पवार आहेत. अजितदादांना सुद्धा संसार आहे, व्यवसाय आहे, समाजकारण आणि राजकारण आहे. रात्री कितीही ऊशीर झाला तरी अजितदादा सकाळी सहाला पायात चप्पल आणि ७ च्या ठोक्याला कार्यालयात हजर असतात. ते ही कधी तरी थकत असतीलच ना.? मग अशावेळी त्यांच्या कामाचा भार हलका करण्यासाठी कोण असेल सोबतीला याचा विचार करा.
कवी दासु वैद्य यांच्या पक्ती जसं सुप्रियाताई अनेकदा म्हणतात, ‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी’. त्याच पद्धतीने, या श्रमलेल्या बापासाठी पार्थदादा हेही नारळाचं पाणी अर्थात आधार आहेत. कारण, अजितदादांचा बराच भार त्यांनी सक्रिय झाल्यापासून खांद्यावर घेतला आहे.
एक घाव दोन तुकडे –
पुण्यात किंवा मुंबईला असल्यावर हजारो लोकं पार्थदादांना भेटत असतात. त्यामध्ये अगदी सर्वसामान्यांपासून ते हायप्रोफाईल व्यक्तींचा समावेश असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील ही मंडळी असतात. पण, ते अशा प्रत्येकाचं सविस्तर ऐकूण घेतात, त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवितात. इतर राजकारण्यांसारखं खोट बोलून ते लोकांना नादी लावत नाहीत, तर एक घाव दोन तुकडे अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षात काही कारणांनी पवारसाहेबांपासून पक्ष वेगळा झाल्यानंतर पक्षाची नव्याने पुर्नबांधणीमध्ये करणे, निवडणुका लढवणे, जिंकणे आणि भविष्याची वाटचाल यात पार्थदादा यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. काळाप्रमाणे पक्षाला कॅार्पोरेट लुक देणं, पक्षात फेस व्हॅल्यू असणारे पदाधिकारी निवडणं, पक्षात सर्व घटकांना सामावून घेणं, सर्वसमावेशक, कार्यक्षम व कर्तृत्ववान लोकांना पक्षात संधी देणं यात ही ते आघाडीवर आहेत.
सन २०११ ते १४ का काळ अजितदादांचा प्रचंड संघर्षाचा होता. विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडून व मिडिया ट्रायल करुन वेगळी इमेज समाजासमोर मांडली होती. मात्र, गेल्या ५ वर्षात अजितदादा हेच ऐकमेव असे नेते आहेत की, स्वपक्षासह, मित्रपक्ष आणि विरोधकांना हवे हवे असतात. प्रत्येकजण दादाचं कौतुक करत असतो. अजितदादांची ही ३६० डिग्रीमध्ये जी इमेज चेंज झाली आहे, त्यात सोशल मिडियापासून, इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. या पाठीमागचा चेहरा ही पार्थदादा आहेत.
काळाचा पुढचा विचार करणारे –
पार्थदादा यांचा अजितदादांप्रमाणे स्वभाव कडक पण तितकाच प्रेमळ आहे. ते अतिशय शिस्तप्रिय आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना निटनिटकेपणा लागतो. टु द पाईंट प्रेझेंटेशन आणि गुणवत्ता त्यांना हवीच हवी असते. गुणवत्तेच्या बाबतीत ते कधीच तडजोड करीत नाहीत. हो किंवा नाही अशी रोखठोक व स्पष्टपणे ते भूमिका घेतात. पार्थदादा येणार आहेत, म्हंटल्यावर तिथं असलेला प्रत्येक जण अलर्ट मोडवर असतो. त्यांच्या नजरेतून चुकीचा व्यक्ती कधीच सुटू शकत नाही इतक अचुक निरिक्षण त्यांचं आहे.सर्वांत महत्वाचं म्हणजे त्यांच्यातील पारदर्शीपणा हा कमालीचा आहे.एखादी गोष्ट करायची तर ती भव्यदिव्य असावी असे त्यांचे विचार असतात. काळाचा पुढचा विचार करणारे ते visionary youth leader आहेत.
त्यांचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हे वेगळ्या कल्चरलमध्ये झालं आहे. त्यामुळे ते ग्रामीण भागातील तरुणांना कदाचित वेगळे वाटत असतील. पण, आज महाराष्ट्रात ५० टक्क्यांहून अधिक अर्बन भाग आहे. आज मीही युवक आहे, माझा नेता ही मला प्रोफेशनली पाहिजे. तो ७०-७५-८० वर्षाचा, कमी शिकलेला, मराठीसोबतच अस्सलिखित हिंदी- इंग्लिश बोलता न येणारा किंवा काम न करणारा असा नेता नको असतो. (पण, याठिकाणी राजु शेट्टी, बच्चु कडू, निलेश लंके सारखे अपवाद ही आहेत.) २१ व्या शतकातील आमच्या पिढीचा आमचा नेता मॅार्डन आणि स्मार्ट हवा असं आमच्या पिढीला वाटतं. उच्चशिक्षित पार्थदादांनी बाहेरील देशांमध्ये ज्या पद्धतीनं पोलिटिकल लिडर राजकीय क्षेत्रात काम करतात, त्यापद्धतीने त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं आहे, तशा धर्तीवर पक्षाला सुद्धा आधुनिक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
२०१९ साली लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना ज्यांनी ट्रोल केलं ते तर भाजप व शिवसेनावाले आज त्यांच्या सोबतच आहेत. उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना अडीच वर्ष सोबत होतीच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट हेही पहिल्यापासून २०२३ पर्यंत सोबत होतेच. मग, आता पार्थदादा तुमच्या सर्वांचेच आहेत ना.
पुर्वी राजे राजवाड्यांच्या काळात ही कर्तृत्ववान राजाचा मुलगा कर्तृत्ववान असूनही बेदखल व्हायचा किंवा त्यास जाणीवपुर्वक बदनाम केलं जायचं. कदाचित असं पार्थदादांच्या बाबतीत होऊ नये म्हणून हे मांडलं आहे.
अनेकांना पटेल किंवा नाही पटेल. पण मी सांगतो, की पार्थ पवार हे प्रचंड कर्तृत्ववान, मेहनती, चाणाक्ष, प्रगल्भ व उत्तम प्रशासक आहेत हे येणारा काळचं उत्तर असेल. मग, ते पोलिटिकल लिडर म्हणून की बिझनेसमॅन म्हणून हे सांगू शकणार नाही.
पण, मला हेही वाटतं, ते खुप मोठे उद्योजक होऊ शकतात. त्यासोबत फ्रंट सिटवर बसून पूर्णवेळ राजकीय क्षेत्रात सक्रियपणे (इलेक्टोरल पॉलिटिक्स) यश मिळवतील याबद्दल सुद्धा शंका नाही. पॅालिटिक्स की बिझनेस या द्वंद्वात ते जिथं असतील तिथं सर्वोच्च असतील हे खात्रीने सांगू शकतो.
पार्थ पवार हे पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याचा नातू असूनही त्यांना साहेबांचा टॅग लागलेला नाही तरीही त्यांचं नाण खणखणीत आहे.
एखाद्याला उगवायच्या आधीच खोडू नका-
“माझं मत पार्थदादा पवार यांना स्विकारा असं नाही तर वस्तुस्थिती स्विकारा असं आहे”. एखाद्याला उगवायच्या आधीच खोडून टाकणं योग्य नाही. याच्या पलीकडे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाची कंगोरे असतीलही. पण, मला जे पार्थदादा समजले तेवढं लिहलं आहे. आजकाल न अनुभवता किंवा न भेटता एखाद्याला ट्रोल करणं चुकीचं आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा अनुभव घ्या आणि मग त्याच्याविषयी व्यक्त व्हा.