दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेस या महासंमेलनाचे देखील आयोजन.
पिंपरी, दि. ३१ – डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे विद्यापीठाचा ‘विशेष पदवीप्रदान’ समारंभ येत्या शनिवार, दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी, दुपारी 4:00 वाजता, विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. सोबतच दोन दिवसीय आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन देखील विद्यापीठात करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातून तज्ञ्, संशोधक, अध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असून आयुर्वेदातील विविध विषयावर व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण व विचार मंथन होणार आहे .
या कार्यक्रमात मा. डॉ. टोनी नेडर (प्रमुख, ग्लोबल ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन ऑर्गनायझेशन,अध्यक्ष, महर्षी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, यूएसए) आणि प्रा. डॉ. सदानंद पी. सरदेशमुख (अध्यक्ष, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट, वाघोली, पुणे) यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आणि उत्कृष्ठ योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ पी. डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
हा विशेष पदवी प्रदान समारंभ डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी, पुणे चे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू मा. डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलपती मा.डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पिंपरी, पुणे, प्र-कुलगुरू मा. डॉ. स्मिता जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे, आणि विश्वस्त व खजिनदार मा. डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या https://www.dpu.edu.in/live या संकेतस्थळावर तसेच डॉ. डी.वाय. विद्यापीठ, पिंपरी, पुणे https://www.facebook.com/dpu.in या फेसबुक पेजवर आपण पाहू शकता अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर यांनी दिली आहे.
दि. 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, पिंपरी, पुणे, इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ आयुर्वेद पुणे, इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन, नेदरलँड आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने आठव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय महासंमेलनास भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे तसेच नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनची मान्यता प्राप्त झाली असून याचे आयोजन पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात होत आहे.
या महासंमेलनाच्या माध्यमातून आयुर्वेदातील संशोधन, नाविन्यपूर्ण संशोधन, भविष्यकाळात आयुर्वेदाची व्याप्ती, गरजा, उपाय योजना आणि अनेक विकार आणि चिकित्सा या विषयावर विचार मंथन होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्नता व माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन आणलेली ‘एकात्मिक आरोग्य योजना’, ‘हिल इन इंडिया’ या योजनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन होत आहे.
ही 8 वी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद काँग्रेस असून यामध्ये दहा देशातील 100 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि 1200 हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक, प्राध्यापक वैद्य आणि विद्यार्थी सहभागी होत आहेत. देश-परदेशातील आयुर्वेदाशी निगडित ५०० हुन अधिक विद्यार्थी, डॉक्टर व संशोधक आपले शोध निबंध या महासंमेलनात सादर करणार आहेत.