चीन दि. ३० – चीनमधील कंपनी अलीबाबानं त्यांच्या एआय तंत्रज्ञानाचं नवं मॉडेल लाँच केलं आहे. अलीबाबानं लाँच केलेल्या एआय मॉडेलचं नाव क्वेन 2.5 मॅक्स (Qwen 2.5 Max) असं आहे. यासोबतचं कंपनीनं डीपसीक एआय (DeepSeek AI), ओपन एआयचं जीपीटी 4ओ आणि मेटाच्या लामा या पेक्षा नव्यानं लाँच केलेलं एआय मॉडेल प्रभावी असल्याचा दावा केला आहे.
चीनची टेक कंपनी अलीबाबानं प्रसिद्धीपत्रक जारी करत हा दावा केल आहे. क्वेन 2.5- मॅक्स हे चांगली कामगिरी करतेय. सध्या उपलब्ध असलेल्या जीपीटी-4ओ, डीपीसीक-व्ही 3 आणि लामा-3.1-405बी पेक्षा अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. मेटा आणि ओपन एआयच्या ओपन सोर्स मॉडेल पेक्षा त्यांचं मॉडेल प्रभावी असल्याचं अलीबाबानं म्हटलं आहे.
डीपसीकच्या एआयच्या लाँचिंगनंतर अमेरिकेतील टेक कंपन्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात घसरल्यानं आर्थिक फटका बसला होता. डीपसीकनं एआयमध्ये पाऊल ठेवताच जगभरातील एआयचं जागतिक चित्र बदलून गेलं होतं. डीपसीकनं 10 जानेवारीला लाँच केलेला एआय असिस्टंट डीपसीक-व्ही 3 आणि 20 जानेवारीला लाँच केलेल्या आर 1 मुळं अमेरिकन टेक कंपन्यांना धक्का बसला होता.
ओपन एआयच्या जीपीटी-4ओ पेक्षा डीपसीक-व्ही 3 चांगलं असून किफायतशीर असल्याचा दावा करण्यात आला होता. डीपसीकची जगभर चर्चा सुरु असताना अलीबाबा कंपनींन क्वेन2.5 मॅक्स एआय मॉडेल लाँच केलं आहे. अलीबाबाचं कामकाज ज्या शहरातून चालतं त्या हंगझोऊ या शहरात गेल्या 20 महिन्यापूर्वी डीपसीक कंपनीची स्थापना झाली होती. सध्या एआय क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातंय. कमी किमतीत चांगल्या कामगिरी करत असल्यानं डीपसीककडे जगभरातील टेक प्रेमींचं लक्ष वेधलं गेलं. डीपसीकची जगभर चर्चा असताना चीनच्या कंपन्यांकडून त्यांना आव्हान दिलं जात आहे. अलीबाबा, टेन्सेन्ट, बैडू या कंपन्यां देखील स्पर्धेत उतरल्या आहेत.
सध्या एआयच्या किमतीवरुन सुरु असलेल्या दराच्या स्पर्धेत कंपन्या बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठ कमी दरात सेवा उपलब्द करुन देत आहेत. डीपसीकनं गेल्या वर्षी V2 मॉडेल लाँच केल्यानं तर चीनमध्ये एआय मार्केटवरुन किंमत युद्ध पेटलं होतं. डीपसीकच्या मॉडेलच्या वापरासाठी 1 यूआन म्हणजेच भारतीय 11 रुपये शुल्क द्यावं लागतं होतं. जे इतर स्पर्धक कंपन्यांच्या एआय मॉडेलपेक्षा किफायतशीर होतं. त्यामुळं अलीबाबाला त्यांच्या एआय मॉडेलच्या किंमतीत 97 टक्क्यांपर्यंत कपात करावी लागली. आर्टिफिशअल इंटेलिजन्स क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेमुळं या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना आता त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल