वर्षांत ४२९ करोड रुपयांचा गंडा

0
39

पिंपरी,दि.21 (पीसीबी) : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तांच्या हद्दीमध्ये सायबर क्राईमच्या घटनांनी लक्ष वेधून घेतलं आहे. २०२४ वर्षांमध्ये तब्बल ४२९ करोड रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ३७ हजार फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. फसवणुकीच्या घटनांमध्ये बहुतांश उच्चशिक्षित तरुण सायबर गुन्हेगारांच्या हाताला लागले आहेत. हे वर्ष सरत असताना सायबर गुन्हेगारी आगामी काळात आव्हानात्मक ठरणारी दिसत आहे.

सध्या सोशल मीडियाचं जग आहे. प्रत्येक गोष्ट जवळ असावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत आहे. मोबाईल द्वारे अख्ख जग आपल्या जवळ आहे. हे सांगायची गरज नाही. पण याच मोबाईलच्या वापरामुळे सायबर गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सर्वसामान्य आणि उच्च शिक्षित व्यक्ती अलगद अडकत आहेत. सध्या डिजिटल अरेस्टची मोठी चर्चा सुरू आहे. यावर सरकारने पाऊल देखील उचललं आहे. तुम्ही तुमच्या मित्राला फोन लावल्यानंतर हॅलो ट्युन्समध्ये तुम्ही घाबरून न जाण्याच आवाहन केलं जात आहे. याआधी असं कधीही घडलेलं नाही. शेअर ट्रेडिंग, डिजिटल अरेस्ट, ओटीपी शेअयरिंग, मोबाईल लिंक, व्हाट्सअप लिंक, टेलिग्राम लिंक, परदेशातून गिफ्टचं आल्याचं आमिष दाखवून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालेलं आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये २०२४ या वर्षात तब्बल ३७ हजार सायबर गुन्हेगारी बाबत ऑनलाईन तक्रारींची नोंद आहे. एकूण ४२९ करोड रुपयांची नागरिकांची फसवणूक झालेली आहे. काही गुन्हेगारांना पकडण्यात पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांना यश आलेलं आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. अपग्रेड होत चाललेली टेक्नॉलॉजी आणि सायबर पोलिसांवर असलेले बंधन यामुळे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासनाने देखील ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. हे काम केवळ प्रशासनाच आणि पोलिसांचं नाही. सर्वसामान्य नागरिकांनी देखील आपला मोबाईल आणि सोशल मीडिया हाताळत असताना सावध राहणं तितकंच गरजेचं आहे.

मोबाईलवर आलेली एखादी लिंक, शेअर ट्रेडिंग संदर्भातील असलेली जाहिरात किंवा ओटीपी संदर्भात आलेला मॅसेज, फोन यामुळे तुमचं बँक खाते रिकाम होऊ शकतं. हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. अशावेळी नागरिकांनी त्यावर क्लिक न करता किंवा त्यांना प्रतिसाद न देता सावधगिरी बाळगता येऊ शकते अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांनी दिली आहे.

सायबर गुन्हेगारी मध्ये तब्बल ४२९ करोड रुपयांची फसवणूक ही खूप मोठी बाब असल्याचे देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर गुन्हेगारी संबंधित सर्वसामान्य आणि उच्चशिक्षित व्यक्तींनी सावध राहणं गरजेचं आहे. वेळोवेळी पोलिसांना माहिती द्यावी किंवा ऑनलाईन तक्रार द्यावी असे देखील हिरे यांनी म्हटलं आहे. सायबर गुन्हेगारी कमी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे फार गरजेचे आहे. कारण चोर तुमच्याकडे येत नाही, तर तुम्ही त्याच्याकडे जाता अशी अवस्था सायबर गुन्हेगारीची आहे. हे सर्व पाहिल्यानंतर उच्चशिक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांनी सावध रहाणे गरजेचे आहे.