गोंदिया, दि. 29 (पीसीबी) : शिवशाही बस उलटून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला. बसमधील ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलेलं आहे. दुपारी एकच्या सुमारास शिवशाहीला अपघात झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
गोंदियातील सडक अर्जुनीत शिवशाही बसला भीषण अपघात झाला. पूर्ण क्षमतेनं भरलेली बस प्रवास सुरु असताना उलटली. अपघातानंतर ती ५० फुटांपर्यंत घासत गेली. या अपघातात १५ ते १७ प्रवासी जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी परिवहन विभागाला मृतांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्चदेखील शासन करणार आहे. मृतांचा आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.