मुंबई, दि. १९ (पीसीबी) – उद्धव ठाकरे हे एखाद्या खाष्ट सासूप्रमाणे असल्यामुळे अनेकजण शिवसेना सोडून बाहेर पडले, असे वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर ‘मातोश्री’च्या गोटातून पलटवार करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. तुमची बायकोही आता सासू आहे, तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? घरातच सुनेला जाच दिसतोय, अशी खोचक टिप्पणी किशोरी पेडणेकर यांनी केली. किशोरी पेडणेकरांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. या टीकेचा किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, खाष्ट सासू म्हणत परत तुम्ही एका स्त्रीलाच बदनाम केलंत, तुमची पण बायको आता एक सासूच आहे. कुठूनही फिरुन एका स्त्रीचीच बदनामी करताय, तुम्ही बदनाम करणारे कोण? खाष्ट सासू म्हणजे काय? तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का?, असा बोचरा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला.
अनुभव असल्याशिवाय कोणीही बोलत नाही. आम्हाला खाष्ट सासू मिळाली नाही, आम्हाला प्रेमळ सासू मिळाली. त्यामुळे खाष्ट सासू घरात आहे, तो अनुभव घेऊन तुम्ही उद्धवजींच्या स्वभावाबद्दल बोलत असाल तर घरातूनच सुरुवात आहे, घरातच सुनेला जाच आहे. खाष्ट सासू म्हणून हिणवणं, हा स्त्रियांचाच अपमान आहे, ते पण वयस्क स्त्रियांचा अपमान आहेस, अशी खरमरीत टीकाही किशोरी पेडणेकर यांनी केली.
राज ठाकरे यांनी शिवडीतील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली होती. त्यांनी म्हटले होते की, एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेकजण पक्ष सोडून गेले, त्यांना ते गद्दार बोलतात. पण खरा गद्दार तर घरात बसलाय, तुम्ही पक्षासोबत गद्दारी केली. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले. या माणसाच्या वागणुकीमुळे पहिले राणे बाहेर पडले, त्यानंतर मी बाहेर पडलो, आता शिंदे… ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला, त्यांना उद्धव ठाकरेंनी घरी जेवायला बोलावलं. उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.










































