दि. १८ (पीसीबी) – एकीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असताना आता भारतात हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सेवेत येणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यांपासून हायड्रोजन ट्रेनचे ट्रायल होणार आहे.ही ट्रेन डिझेल किंवा वीजेवर धावणार नसून ती चक्क हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून करणार आहे.भारताने साल 2030 पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
हायड्रोजन इंधन वापरणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. ही ट्रेन ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहे. डिझेल किंवा वीजेच्या ऐवजी ही ट्रेन हायड्रोजन वायूवर वीज तयार करेल आणि त्यावर धावणार आहे. पाणी म्हणजे रासायनिक भाषेत H20 होय. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू असे मिळून पाणी तयार होते. याच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या केमिकल कॉम्बिनेशनमधून वीज तयार केली जाणार आहे.यातून एकमेव बाय प्रोडक्ट म्हणून पाणी आणि वाफ तयार केली जाईल.
भारतीय रेल्वे हायड्रोजन ट्रेनच्याद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करणार आहे आणि डिझेल इंजिनाने होणारे हवेचे प्रदुषण कमी करणे हा हेतू आहे. हायड्रोजनचा वापर करुन ही ट्रेन कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे प्रदुषण निर्माण करणारे घटक तयार करीत नाही. त्यामुळे ही ट्रेन कोणतेही हानिकारक उत्सर्जन करणार नाही. यातून कोणतेही प्रदुषण होणार नाही.
या ट्रेनमुळे डिझेल इंजिनाच्या तुलनेत 60 टक्के कमी ध्वनी प्रदुषण होईल. भारतीय रेल्वे 35 हायड्रोजन ट्रेन देशभर तैनात करण्याची योजना आखत आहे. हायड्रोजन ट्रेनची पहिली ट्रायल रन हरियाणाच्या जिंद-सोनीपत मार्गावर होणार आहे. या 90 किलोमीटरच्या मार्गावर हायड्रोजन ट्रेनची चाचणी होणार आहे. त्यानंतर दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, नीलगिरी माऊंटन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे सारख्या हेरिटेज माऊंटेन रेल रूट या ट्रेनच्या चाचणी होऊ शकतात.
वेग किती आणि खर्च किती असणार ?
या ट्रेनचा कमाल वेग दर ताशी 140 किमी इतका असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगवान आणि प्रदुषणमुक्त प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.एकदा फ्युअल भरल्यानंतर ही ट्रेन 1,000 किलोमीटर पर्यंत धावू शकणार आहे. या ट्रेनला एका तासाला सुमारे 40,000 लिटर पाण्याची गरज लागणार आहे, ज्यासाठी खास वॉटर स्टोरेज फॅसिलिटी असणार आहे. प्रत्येक मार्गावर हायड्रोजन ट्रेनला सुमारे 80 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.