थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
57

भाऊसाहेब भोईर यांची लढाई परिवर्तनाचीयशस्वी होणार ?

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) – भाऊसाहेब भोईर. शहराच्या राजकारण, समाजकारण आणि प्रामुख्याने सांस्कृतिक चळवळीतले एक वजनदार नाव. परखड स्वभाव, धारदार वक्तृत्व, अभ्यासू आणि दूरदृष्टीचे खरे दमदार नेतृत्व. पाच टर्म नगरसेवक राहिले मात्र, सरळसोट आणि रोखठोक स्वभावामुळे कधी ना महापौर झाले, ना आमदार, खासदार. राजकारणासाठी आवश्यक सर्व काही होते आणि आजही आहे. अगदी सत्ता, पैसा, मनुष्यबळ कशा कशाची कमी नाही. एक मोठा दुर्गुण होता तो म्हणजे नेत्यांची हुजरेगीरी, चमचेगीरी किंव छक्केपंजे करणे या माणसाला कधी जमले नाही. दिवंगत लता मंगेशकर आणि आशा भोसलेंसह मंगशकर कुटुंबियांच्या गळ्यातील ताईत होऊन बसले. हिंदी आणि मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील दिग्गज कालाकारांच्या तोंडी ज्यांचे नाव असते असा हाडाचा कार्यकर्ता, नेता. गरज ओळखून पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ ज्यांनी रुजवली ते भोईसाहेब भोईर. आता राजकारणात आरपार की लढाई लढयचीच म्हणून विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरलेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते उमेदवार असतील हे जवळपास निश्चित. विचारांनी प्रगल्भ असल्याने आजतरी पक्ष किंवा चिन्ह हा त्यांच्यासाठी तसा दुय्यम मुद्दा. आता लोकांनी किती आणि कशी साथ देतात त्यावर ते आमदार होणार की नाही ते ठरणार.

खरे तर, आयुष्यभर काँग्रेस विचारांची साथ केली. या शहराच्या जडणघडणीत खऱ्या अर्थाने ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या दिवंगत शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचा भाऊसाहेब हा खरा राजकिय वारस म्हणा की पट्टशिष्य. काँग्रेसची अर्धी फौज मोरे सरांना सोडून शरद पवार, अजित पवार यांच्याकडे गेली त्याचवेळी भाऊसाहेबांनी काळाची पावले ओळखली आणि काँग्रेसला रामराम केला. २००९ मध्ये सर्वात जेष्ठ म्हणून साहेबांनी चिंचवडमधून भाऊसाहेबांना उमेदवारी दिली होती. अजितदादांना ते पसंत नव्हते म्हणून त्यांनी लक्ष्मण जगताप यांना बंड करायला लावले, अपक्ष उभे. अन्यथा त्याचवेळी भाऊसाहेब आमदार झाले असते. तिथे भाऊसाहेब एकाकी पडले आणि पराभव झाला. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी २०१४ मध्ये शिवसेनेने त्यांना ऑफर दिली होती, पण पुरोगामी विचारांशी प्रतारणा नको म्हणून त्यांनी विनम्रपणे ती नाकारली होती. २०१४ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भाजप प्रवेशापूर्वीच एक सुसंस्कृत नेता म्हणून भोईर यांनी पक्षात यावे यासाठी भाजपनेसुध्दा पायघड्या अंथरल्या होत्या, पण तिथेही वैचारीक बैठक नसल्याने त्यांनी कच खाल्ली. अन्यथा भोईर हे तेव्हाच आमदार, खासदारच नव्हे तर शहराचे नेतेसुध्दा झाले असते. रात गयी बात गयी. आता भोईर यांनी आयुष्यातील अंतिम लढाई स्वतःच्या जीवावर लढायचे ठरवले आहे. लढाई परिवर्तनाची, विकासाच्या निर्धाराची अशी घोषणा करत ते आखाड्यात उतरलेत.
सर्वपित्री अमावस्या असूनही २ ऑक्टोंबर, गांधी जयंतीच्या निमित्ताने भोईर यांनी आपला निर्धार जाहीर केला. रहाटणी येथील अवाढव्य अशा थोपटे लॉनवर आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी घेतला. गर्दी मोठी होती. आता तो माहोल मतपेटीपर्यंत टिकेल का नाही त्याबाबत आताच सांगता येणार नाही. बाकी काही असो, भोईर यांच्या सारख्या नेत्याने जे मुद्दे प्रचारात घेतले ते महत्वाचे आणि डोळ्यात अंजन घालणारे आहेत म्हणून हा लेखन प्रपंच केलाय. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दृष्टचक्र भेदण्याचा त्यांचा संकल्प आहे. भ्रष्टाचारातून मतांची खरेदी विक्री करून राजकारणाचा धंदा करू पाहणाऱ्यांवर ते तुटून पडतात. माझा कुठले ठेका नाही, असे ते जाहीरपणे सांगतात आणि समोरच्या स्पर्धक उमेदवारांना अप्रत्यक्षपणे कानशिलात लगावतात. भाजपच्या सत्ता काळात किती लूट झाली ते आकडेवारीसह सांगतात आणि जनतेला सावध करतात.

प्रचारातील मुद्दे अत्यंत प्रभावी, बनितोड –
चोवीस तास – चोवीस तास पाणी देणार म्हणून राज्यकर्त्यांनी वारंवार घोषणा केली होती. आज पाच-दहा वर्षे होत आली. चोवीस तास नाही तर दिवसाआड पाणी कायम आहे. पाच हजार हाऊसिंग सोसायट्या पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरसाठी लाखो रुपयेंचा भुर्दंड सहन करतात. पाणी पट्टी भरायची आणि त्याच्या पाच-दहा पट पाण्यासाठीच टँकरवर पैसे खर्च करायचे. करदात्यांची दुहेरी लूट सुरू असलेला हा तीन लाख मतदार आज तमाम राजकारण्यांना शिव्याशाप देतोय.
वाहतूक कोंडी – राज्यातील सर्व प्रशस्त रस्ते असल्याने हे शहर तुफान वेगाने वाढले. आज हे रस्ते वाहतूक कोंडीत अडकलेत. हिंजवडी, तळवडे, खराडी येथे दैनंदिन कामासाठी ये-जा करणारा तब्बल पाच लाख आयटी कर्माचारी त्रस्त आहे. आयुष्यातील रोजचे दोन नव्हे तर तब्बल तीन-चार तास केवळ वाहतूक कोंडीत वाया जातात. हिंजवडीतील ५० कंपन्या आता स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. बजाज ऑटो कंपनीचे मालक राजीव बजाज यांनी गेल्याच आठवड्यात एक ट्विट केले आणि आकुर्डी ते कोरेगाव पार्क या २५ मिनिटांच्या अंतरासाठी चार तास लागल्याचा अनुभव सांगितला. यावर्षीच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची चाळण झाली होती. पुणे मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजुच्या सेवा रस्त्यांवर अक्षरशः गुडघाभर खोलीच्या खड्यांमुळे वाहने अडकून पडली. महिनाभर लोकांनी सहन केले, मात्र एकाही राज्यकर्त्याने ढुंकून पाहिले नाही. स्मार्ट सिटीच्या विकासाचे पितळ उघडे पडले.
भोईर यांनी त्यांच्या प्रचार पत्रात अशाच काही मूलभूत समस्यांचा उल्लेख करून आपल्याला आमदारकी नेमकी कशासाठी पाहिजे ते सांगितले.

टीडीआर, टेंडर घोटाळा करण्यासाठी आमदारकी नको –
येणाऱ्या निवडणुकित काही उमेदवारांना आमदारकी पाहिजे आहे ती टीडीआर किंवा टेंडर घोटाळा करण्यासाठी, असे म्हणत भोईर यांनी भाजपचे संभाव्य उमेदवार शंकर जगताप यांच्यावर निशाना साधला आहे. अशा सर्व लुटारुंच्या हलगर्जीपाणामुळे एकेकाळी शांत, स्वच्छ आणि सुंदर असलेले आपले शहर आज बकाल झाले, अशी टीका भोईर करतात. हे बदलायचे तर सुजाण, सुशिक्षित आणि समजदार मतदाराला ते एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन करतात. भोईर यांची प्रचंड तळमळ समजू शकते. बाजारू विश्वातले आजचे वास्तव खूप वेगेळ आहे. मताला चक्क २ ते ३ हजार रुपये भाव फोडून लोकशाहिचा बाजार करणाऱ्यांचीच अलिकडे सरशी होताना दिसते. तसे पाहिले तर भोईर यांच्या आजवरच्या कामाची विरोधातील नावांपैकी एकाच्याहीबरोबर तुलना होणार नाही. आता परिक्षा जशी भोईर यांची आहे तशी मतदारांचीसुध्दा आहे. परिवर्तनाची लढाई चालते का, शेवटपर्यंत टिकते का, मतपेटीतून खरोखर जिंकते का ते पाहायचे.