पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे साहित्य
पिंपरी, दि. १३ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा थेट लाभ मिळावा हा उद्देश असलेल्या उपक्रमातून आत्तापर्यंत शाळेमध्ये उपस्थित असणाऱ्या तब्बल ४९,००० विद्यार्थ्यांना रेनकोट, शूज, शालेय साहित्याच्या किटचे यशस्वीपणे वितरण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बॅंक ऑफ बडोदाच्या सहकार्याने, डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहून उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे.
साहित्याचे टप्प्याटप्प्याने यशस्वी वितरण
‘डीबीटी’च्या पहिल्या टप्प्यामध्ये अंदाजे ३९,००० उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले, तर उर्वरित १०,००० शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये किटचे वाटप करण्यात आले असून ज्यांनी शाळेमध्ये उशिरा प्रवेश घेतला अशा विद्यार्थांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला.
असंख्य आव्हानांवर शिक्षण विभागाचा तोडगा
शिक्षण विभागाकडे असणारे पालकांचे चुकीचे मोबाइल क्रमांक आणि शाळांना असणाऱ्या सुट्ट्यांमुळे होणारा विलंब व विक्रेत्यांच्या साहित्याबाबतची गुणवत्ता पडताळणी सारख्या आव्हानांचा सामना करताना शिक्षण विभाग उपक्रमाच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी सक्रिय राहिला आहे. त्याचबरोबर, सध्या सुरू असलेल्या सणासुदीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्यावर, विद्यार्थ्यांना आवश्यक आकाराचे शूज मिळणार आहेत. जे संबधित शाळांना विक्रेत्यांकडून वितरित करण्यात आले आहेत.
भविष्यमध्येही ‘डीबीटी’ उपक्रमासाठी जलद आणि कार्यक्षम प्रक्रिया राबविणार
“चालू शैक्षणिक वर्षामध्ये ‘डीबीटी’च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेचे साहित्य पुरवता आले आहे. ई-रूपी सारख्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेमुळे निधीचा कार्यक्षमतेने वापर करण्यात आला असून याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. चालू वर्षी यशस्वी झालेल्या उपक्रमामुळे भविष्यामध्येही प्रत्येक विद्यार्थ्याला अशा उपक्रमांचा लाभ होणार असून यापुढे यापेक्षा जलद आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया राबवू असा आम्हाला विश्वास आहे.”
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
‘डीबीटी’ उपक्रमातील अनेक आव्हानांवर मात करून विद्यार्थ्यांना मौल्यवान शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध
“ई-रूपी डिजिटल पेमेंट प्रक्रिया वापर करून आम्ही निधीचा कार्यक्षमपणे वापर केला आहे. त्याबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांकरिता पेमेंटची संपूर्ण प्रक्रिया सुलभ केली आहे. आमच्या समोरील विक्रेत्यांचे वर्गीकरण, दर्जेदार उत्पादनांची पडताळणी अशा आव्हानांवर मात करून आम्ही विद्यार्थांना मौल्यवान शिक्षण देत आहोत. आगामी काळामध्ये ‘डीबीटी’ उपक्रमामध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया राबविण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
शैक्षणिक साहित्याबाबत समस्या असणाऱ्यांना साहित्य बदलता येईल
“आम्ही ‘डीबीटी’ उपक्रम राबविताना ज्या अडथळ्यांचा सामना केला त्यामधून उपक्रमातील बारकावे स्पष्टपणे जाणवले आहेत. त्यामुळे आम्हाला पुढील शैक्षणिक वर्षामध्ये ‘डीबीटी’ उपक्रम जलद आणि यशस्वीरीत्या राबविण्यासाठी मदत होणार आहे. ज्या पालक किंवा विद्यार्थ्यांस साहित्याच्या गुणवत्तेशी संबंधित समस्या असतील अशा अत्यावश्यक वस्तूबाबत संबंधित शाळेमध्ये माहिती देऊन ते साहित्य बदलू शकणार आहेत.”
- विजय थोरात, साहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
ई-व्हाऊचरद्वारे ठरवून दिलेल्या नियमानुसार साहित्याचे वाटप
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे महापालिकेच्या मोहननगर (मुले) प्राथमिक शाळेतील १५४ विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’ ई-व्हाऊचरद्वारे साहित्यवाटप करण्यात आले. प्रत्यक्ष व्हेंडर शाळेमध्ये येऊन पालकांचे व्हाऊचरद्वारे स्कॅन करून ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे साहित्य प्राप्त झाले. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी ‘डीबीटी’ ई-व्हाऊचरद्वारे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले असून मागील योजनेपेक्षा चालू योजना चांगली आहे.
- रवींद्र रामचंद्र शिंदे, मुख्याध्यापक, मोहननगर (मुले), प्राथमिक शाळा
कोट – चालू वर्षाची ‘डीबीटी’ योजना योग्य
माझा मुलगा मोहननगर (मुले) प्राथमिक शाळेचा विद्यार्थी असून या वर्षी ‘डीबीटी’ ई-व्हाऊचर प्रणालीद्वारे पूर्ण साहित्य मिळाले. मागील वर्षीपेक्षा या वर्षीची योजना योग्य आहे.
- श्री. नवनाथ विश्वनाथ पात्रे, पालक व अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, मोहननगर (मुले) प्राथमिक शाळा