आम्ही ज्ञानेश महाराव यांच्यासोबत…. संभाजी ब्रिगेड!

0
214

दि.१३ (पीसीबी) – संभाजी ब्रिगेडच्या नवी मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनात ज्येष्ठ संपादक व विचारवंत ज्ञानेश महाराव यांचे भाषण झाले. त्यांच्या भाषणाचा विषय होता, “भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या विचारधारेची लोकशाही.” संबंधित विषयाला अनुसरूनच त्यांनी संविधानामध्ये अंतर्भूत असणारी लोकशाही मूल्यं आणि वर्तमान काळात अनुभवायास मिळणारी राजकीय, सामाजिक, आर्थिक, इ. परिस्थिती यांचा तुलनात्मक आढावा घेतला.

विषयाला अनुसरून बोलत असताना त्यांनी मनुस्मृतीच्या कायद्यामुळे भारतीय स्त्रियांना नाकारण्यात आलेले अधिकार, त्यांच्यावर लादलेली बंधने व त्यातून त्यांचे झालेले शोषण याबद्दल काही उदाहरणं दिली. त्यामध्ये त्यांनी पुराणांतील सत्यवान-सावित्रीची कथा, रामायणातील सीतेची अग्निपरीक्षा अशी काही उदाहरणं दिली होती. अलीकडच्या काळात राम या प्रतिकाचा वापर करून संघ, भाजप परिवारातील लोक कशा पद्धतीने धार्मिक राजकारण करत आहेत, सत्ता मिळवून कशा पद्धतीने जनतेला लुटायची कामे करत आहेत आणि हिंदुत्व या आकर्षक नावाखाली कशा पद्धतीने ब्राह्मणी वर्चस्वाचे विचार लोकांच्या डोक्यात घालण्याचे उद्योग करत आहेत या संदर्भाने बोलताना ज्ञानेश महाराव यांनी आपली रोखठोक मते मांडली. पुढे बोलत असताना त्यांनी नाटककार मामा वरेरकर यांच्या “भूमिकन्या सीता” या नाटकाचा संदर्भ देऊन त्यातील राम आणि लक्ष्मणाची पत्नी उर्मिला यांच्यातील संवाद उद्धृत करताना उर्मिलाने रामाला आपली अग्निपरीक्षा घेण्याचे दिलेले आव्हान याबद्दल माहिती दिली. तसेच रामायणाच्या कथेत रामाने सीतेच्या पातिव्रत्यावर शंका घेणे, एका धोब्याच्या आक्षेपावरून आपल्या गर्भवती पत्नीचा त्याग करून तिला जंगलात सोडण्याचा निर्णय घेणे, आपल्या पत्नीचे पावित्र्य तपासण्यासाठी तिला अग्नीत उडी घ्यायला सांगणे, इ. प्रचलित गोष्टींमधील नितीमत्तेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून वर्तमानकाळाशी तुलना करता आज आपल्या बहिणीसोबत कुणी असा अमानवी व्यवहार केल्यास त्याला आपण सोडू का, असा प्रश्न श्रोत्यांना केला.

ज्ञानेश महाराव यांनी आपल्या संपूर्ण भाषणात इतरही अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामध्ये त्यांनी स्वामी समर्थ यासारख्या टीव्ही सिरियल्सच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा प्रसार करणाऱ्यांवर आक्षेप घेतला आहे. तसेच एरवी समाजात वावरताना कसे कपडे घालावे याचे सल्ले देणारे तथाकथित संस्कृतीरक्षक अशा सिरियल्समधून होणाऱ्या उत्तान अंगप्रदर्शनाकडे कसे दुर्लक्ष करतात हा विरोधाभास त्यांनी दाखवून दिला. यासोबतच करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील पवित्र तीर्थकुंडात, ज्या कुंडातील पाणी वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात, तिथे गोपाळ रामचंद्र बडवे नावाचा पुजारी १५ मे २००३ रोजी मध्यरात्री लघवी करताना सापडला होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली. मुळातच महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संतांनी नामस्मरण हा सोपा भक्तिमार्ग सांगून दगडामध्ये देव शोधण्यासाठी तीर्थस्थळी जाणाऱ्या लोकांवर कडक शब्दात प्रहार केले आहेत. त्याच संतवाणीचा दाखला देऊन ज्ञानेश महाराव यांनी वारकरी बांधवांना संतांचे तरी विचार जोपासा असे आवाहन केले.

ज्ञानेश महाराव यांच्या उपरोक्त काही मांडणीवर आक्षेप घेऊन त्यांचे संपूर्ण भाषण न पाहता केवळ त्यांची काही अर्धवट वाक्यं कट करून गेल्या काही दिवसांत त्याचे व्हिडिओ सोशल मिडियात पसरवून आकांडतांडव करण्यात आला. त्यांच्याबद्दल अनेक चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी निषेध, आंदोलने करण्यात आली. गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु झाले.

मुळात ज्ञानेश महाराव यांचे संपूर्ण भाषण यांनी पाहिले आहे का? तसेच त्यांना ते समजले आहे का?

कारण आपल्या देशात राज्यघटना लागू झालेल्याला पुढच्या वर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आहे आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आहे. लोकशाहीच्या या मूल्यांचा आपण आदरच केला पाहिजे. कुठल्याच धर्मात कुठल्याही महिलेचे धर्माच्या नावाखाली शोषण होऊ नये, लोकशाही मूल्यं पायदळी तुडवून धर्मांधता वाढीस लागू नये हीच अपेक्षा आहे. लोकशाहीपेक्षा कुठलाही धर्म आणि राज्यघटनेपेक्षा कुठलंही धार्मिक पुस्तक मोठं नाही हे वर्तमान वास्तव आहे. त्यामुळं ज्ञानेश महाराव आपल्या भाषणातून जे सांगतात ते त्याच राज्यघटनेची आणि त्यातील मूल्यांची जपणूक करणारे आहे. त्यांची भाषा रोखठोक असेल, पण आताच्या उन्मादी धार्मिक वातावरणात याच भाषेची गरज भासत असते. मात्र त्यावरून समाजातील भावनिक लोकांना भडकावून संघ, भाजप परिवारातील तथाकथित संस्कृतीरक्षक लोक त्यांना ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी उद्युक्त करत आहेत. ज्ञानेश महाराव यांच्यावर दबाव टाकण्याचा, त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे करून प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? प्रश्न तर जागच्या जागीच राहतील आणि हिंदुत्वाच्या नावाखाली समाजाचे असेच भावनिक शोषण होत राहील. रामाचे एकंदर चरित्र त्याज्य असल्याचे कुणीही मानत नाही, परंतू पुराणात उभ्या केलेल्या रामाच्या व्यक्तिमत्वाची चिकित्सा करून त्याच्या चरित्रातील अमान्य असणाऱ्या घटना नाकारण्याचे अथवा त्या घटनांबाबत दोष देण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. प्रत्येकाने एकमेकांच्या या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे, तीच लोकशाहीची खरी ओळख आहे.

मात्र ७५ वर्षांनंतरही आपली लोकशाही अजून परिपक्व झाली की नाही हा प्रश्न पडतो. समाजात वैचारिक घुसळण करायची सोडून प्रतिवादापासून पळ काढणे हे परिपक्व लोकशाहीला अभिप्रेत नाही. म्हणूनच भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असणाऱ्या विचारधारेची लोकशाही कोणती हे समाजाला सांगण्याची आज गरज पडत आहे. ते सांगण्याचे धाडस ज्ञानेश महाराव करत आहेत. त्यांच्या धाडसाला सलाम..

हे तेच ज्ञानेश महाराव आहेत ज्यांनी २००३ मध्ये सर्वप्रथम जेम्स लेन या विदेशी लेखकाने पुण्यातील ब्राह्मण मंडळींच्या मदतीने जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीचा केलेला प्रयत्न समाजासमोर उघडा पाडला होता. अशा सच्चा शिवप्रेमी व्यक्तीला संघ, भाजप परिवारातील व्यक्तींकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही.

संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने ज्ञानेश महाराव यांच्या पाठीशी उभी आहे. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांना आणि राज्यघटनेला जी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांवर आधारित असणारी विचारधारा अभिप्रेत आहे, त्याच्या रक्षणासाठी आणि रक्षणकर्त्यांसाठीही संभाजी ब्रिगेड लढत राहणार…