“चार-सहा महिने थांबा, मला राज्यातलं सरकार बदलायचं“

0
134

बारामती, दि. १२ (पीसीबी) – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडीने भाजपाप्रणित एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. एनडीएने बहुमत मिळवलं असलं तरी इंडिया आघाडीने तब्बल २३५ जागांपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (इंडिया) महायुतीवर (एनडीए) मात केली. मविआने राज्यातील ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या तर महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्रात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी महायुतीसमोर तगडं आव्हान निर्माण केलं. पक्ष फुटल्यानंतर ही निवडणूक ठाकरे आणि पवारांसाठी अस्तित्वाची लढाई बनली होती. मात्र या दोन्ही नेत्यांनी सर्व दावे आणि एक्झिट पोल खोटे ठरवत दमदार पुनरागमन केलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्यात नऊ तर शरद पवारांच्या पक्षाने आठ जागा जिंकल्या. दरम्यान, हे दोन्ही नेते आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवारांनी तर आत्तापासूनच दौऱ्यांना सुरुवात केली आहे. पवारांनी वेगवेगळ्या गावांमधील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दरम्यान, इंदापूर दौऱ्यावेळी शरद पवार यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी पवार ग्रामस्थांना म्हणाले, “चार-सहा महिने थांबा, मला राज्यातलं सरकार बदलायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल.”

शरद पवार यांनी आज पुरंदर तालुक्याच्या कोळविहिरे येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तुम्ही चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे. हे सरकार बदलल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांसाठी हवी तशी धोरणं राबवता येत नाहीत. सरकार बदलल्यावर आपण शेतकऱ्यांसाठी कामं करू.

शरद पवार म्हणाले, गेले पाच-सहा दिवस राज्यातल्या काही भागांमध्ये एक वेगळं चित्र दिसत होतं. राज्य सरकारनेसुद्धा काही गावं, काही तालुके हे दुष्काळी म्हणून जाहीर केलेले आहेत आणि साधारणत: त्याच्यामध्ये ज्यांचा उल्लेख होता, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अग्रभागी होता. तेव्हाच मी ठरवलं एखादा दिवस काढायचा आणि काही गावांना जाऊन भेटी द्यायच्या व येणाऱ्या संकटांपासून लोकांची सुटका करण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करायची? आणि दुसऱ्या बाजूने कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घ स्वरूपाचे काय कार्यक्रम हातामध्ये घेता येतील? त्याची माहिती लोकांकडून घ्यायची आणि त्याच दृष्टीने मी या ठिकाणी आलो.