हडपसर येथे फासावर लटकलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात पोलीसांना यश

0
2146

हडपसर, दि. १५ (पीसीबी) – हडपसर येथे कौटुंबिक वादातून एका इसमाने रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास स्वत: ला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती गस्तीवर आलेल्या हडपसर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना मिळाली. त्यांनी काही वेळातच घटनास्थळी धाव घेऊन त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करुन त्याचे प्राण वाचवले.

बीट मार्शल विठ्ठल चिपाडे व युवराज कांबळे असे फास घेणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्या दोघा पोलिसांची नावे आहेत. तर सुब्बु नायर (वय ३२, रा. भगवती हाऊसेस, हडपसर) असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिस ठाण्याचे बीट मार्शल विठ्ठल चिपाडे आणि युवराज कांबळे हे रविवारी रात्रीगस्तीवर होते. त्यावेळी पोलिस नियंत्रण कक्षातुन कौटुंबिक भांडणातून एका व्यक्तीने भगवती हाऊसेस, हडपसर येथे गळफास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर दोघेही काही मिनीटातच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सुब्बु नायर यांनी गळफास घेतला होता. चिपाडे व कांबळे यांनी तत्काळ आतून बंद असलेला दरवाजा जोरदार धक्के मारुन उघडला.  आणि नायर यांच्या गळ्यातील फास चाकूने कापला.  त्यानंतर त्वरीत रुग्णवाहिकेतून नायर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार केले. थोड्या वेळाने नायर शुद्धीवर आले आणि त्यांचे प्राण वाचले. यामुळे चिपाडे आणि कांबळे यांचे सर्वस्थरातून कौतूक होत आहे.