सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
302

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना विशाल नगर पिंपळे निलख येथे घडली. रवींद्र बाळकृष्ण लंगोटे (वय 39, रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल अशोक जवळेकर, निखील अशोक जवळेकर आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचा विवाह विशाल जवळेकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती विशाल आणि अन्य आरोपींनी फिर्यादी यांच्या बहिणीला मानसिक व शारीरिक त्रास दिला. तुझ्या आई वडिलांनी लग्नात मानपान केला नाही. आम्हाला हुंडा दिला नाही. तू पांढऱ्या पायाची आहेस. तू करणी धरणी केल्यामुळे वडील अशोक जवळेकर यांचा मृत्यू झाला. नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची सारखी तक्रार करत असतेस, असे म्हणत आरोपींनी विवाहितेचा छळ केला. आरोपींनी विवाहितेला उपाशी ठेऊन मारहाण केली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने सोमवारी (दि. 6) राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली. विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.