मोदींचं ठाकरे प्रेम…..?

0
128

“गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिवसेनाप्रमुखांनी तो रोखला त्यामुळं प्रधानमंत्रीपदाचा मार्ग सहज साध्य झाला. पण त्याची जाणीव न ठेवता शिवसेनेची शकलं केली. ठाकरेंची सत्ता उलथून टाकली. आता मोदींनी बाळासाहेब, उद्धव, ठाकरे कुटुंबाबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा, बेरजेच्या राजकारणासाठी दाखवलाय. यावेळी शिवसेनेची बाळासाहेबांची विचारधारा सोडली अशी टीकाही केली. पण शिवसेनाप्रमुखांनी केवळ भाजपशी नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, रिपब्लिकन, अगदी मुस्लिम लीगशी देखील युती केली होती. त्यावेळी हिंदुत्व कुठं आडवं आलं नव्हतं. हे कदाचित मोदींना माहीत नसावं. शिवसेनेनं मराठी माणूस आणि महाराष्ट्रधर्म पाळत आजवरचे राजकारण केलंय. ते कसं केलं, याचा घेतलेला हा धांडोळा…!”

गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातेत दंगल उसळली. तेव्हा मोदींचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं, त्यांना बदलण्याच्या हालचाली वाजपेयी, अडवाणी यांनी सुरू केल्या; तेव्हा मोदींच्या मागे शिवसेनाप्रमुख ठामपणे उभे राहिले. त्यानंतरच मोदींची प्रधानमंत्रीपदापर्यंतची वाटचाल सुकर झाली. पण कृतघ्नतेच्या जीन्स असलेल्या भाजपनं आणि सत्तेच्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी मोदींनी शिवसेनेची शकलं केली, उद्धवची सत्ता उलथवून टाकली, त्यांना पदच्युत केलं. कधीकाळी ज्यांचं बोट धरून भाजपनं महाराष्ट्रात आपला विस्तार केला होता. याचा विसर पडला. पण महाराष्ट्र धर्म जागविणारी शिवसेना अडचणीत आलीय हे लक्षांत येताच कधीकाळी शिवसेनेनं मदत केलेली वा ज्यांची मदत शिवसेनेनं घेतलेली अशी मराठी माणसं शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यात काँग्रेसी आहेत तसे शरद पवार आहेत, समाजवादी आहेत तसे संभाजी ब्रिगेड, डाव्या विचारांचे आहेत. रिपब्लिकन आहेत तसे आंबेडकरी विचारांचे आहेत. मुस्लिम आहेत तसे ख्रिश्चनही आहेत. हे बदललेलं वातावरण पाहून मोदींना कदाचित उपरती झाली असावी म्हणूनच त्यांनी ठाकरेंवरच बेगडी प्रेम, मुलाखतीतून दाखवलंय. आपल्या मनांत अद्यापही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रेम, आदर आणि श्रद्धा असल्याचं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, ‘शिवसेना फुटल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं ते बाळासाहेबांप्रती आदर व्यक्त करण्यासाठीच..!’ ठाकरे कुटुंबांशी आपलं प्रेमाच नातं आजही कायम आहे. उद्धव आजारी असताना आपण रश्मी वहिनींना फोन करून चौकशी करत होतो, जर काही मदत लागली तर त्यांना मदत करणारा मीच पहिला असेन…!’ असं सांगताना ‘उद्धव यांनी बाळासाहेबांचा विचार सोडून दिलाय..!’ अशी टिपण्णीही त्यांनी केली. पण शिवसेनेचं अस्तित्व संपविण्यासाठी भाजपनं जो खेळ केला होता, हे उद्धवना आणि मराठी माणसांना माहीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेलं मतदान, आपल्या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली मिळालेली राजकीय स्थितीची माहिती, सर्व कंपन्यांनी, वृत्तपत्रांनी केलेल्या पाहणीत उद्धव आणि शिवसेनेला मिळत असलेला पाठींबा, शिंदेंच्या शिवसेनेसोबत होणारी भाजपची फरफट, मतदारांमध्ये उद्धवना मिळणारी सहानुभूती यानं व्यथित झालेल्या मोदींनी उद्धवना गोंजरण्याचा प्रयत्न चालवलाय, असं जाणवतंय. जाहीरपणे ‘नकली शिवसेना’, ‘वसूली सेना’ अशा शेलक्या शिव्या देणाऱ्या भाजप नेत्यांना ही उपरती झाली असावी. बाळासाहेबांच्या निधनानंतर २०१४ विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी ऐनवेळी युती तोडली. पण उद्धवांनी ६२ जागा जिंकल्या. त्यानंतर अमित शहा २०१९ मध्ये युतीसाठी मातोश्रीवर आले. आणाभाका घेतल्या, तशा त्या मोडल्या देखील. दरम्यान फडणवीसांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी उरकला. मग उद्धवांनी बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इथं जी ठिणगी पडली ती आजतागायत धगधगतेय? मग शिवसेना फोडली, शिंदेंना सोबत घेत आपलं सरकार भाजपनं मांडलं. पण आता लोकसभा निवडणुकीतून आलेल्या साऱ्या सर्व्हेतून उद्धवना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. म्हणूनच ते उद्धवना ‘आओ मारी साथे…!’ म्हणत साद घालण्याचा प्रयत्न करताहेत, असं दिसतंय. म्हणूनच भाजपनं या लोकसभा निवडणुकीत एखाद दुसरा अपवाद वगळता थेट उद्धव सेनेशी पंगा घेण्याचं टाळलेलंय. उद्धवसेनेनं आज महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची जागा घेतलीय. त्यामुळेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते सतत उद्धवना लक्ष्य करतात. उद्धव यांनी बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्व सोडल्याची टीका करतात. शिवसेनेचं हिंदुत्व कधीच आग्रही नव्हतं. ते लवचिक आणि प्रबोधनी होतं. शिवसेनेचा पूर्वेतिहास, वाटचाल पाहिली तर बाळासाहेबांनी सर्वच पक्षाशी युती केलेलीय. अगदी मुस्लिम लीग, रिपब्लिकन पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, भाजप अर्थात काँग्रेसशी देखील युती, आघाडी, तडजोडी केल्या आहेत. तिथं कधीच त्यांना हिंदुत्व आड आलेलं नाही. त्यामुळं भाजपशी युती तुटली म्हणजे हिंदुत्व सोडलं, विचार सोडला असं नाही. भाजपचं जीन्स कृतघ्नतेचं आहे असं जे वर म्हटलंय याचं कारण म्हणजे, जनसंघ, भाजपनं यांच्या जन्मापासूनच छोट्या छोट्या पक्षांना बलाढ्य काँग्रेसची भीती दाखवत युती केलीय. त्यानंतर त्यांच्यासारखंच रूप धारण करून त्यांना संपवलंय. रामराज्य पक्ष, हिंदू महासभा, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, अकाली दल, तेलुगु देशम् अशा पक्षांची काय अवस्था आहे हे आपण पाहतोच. शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असंच करायचं त्यांचा डाव आहे. पण मराठी माणसांनी उद्धव आणि शरद पवार यांच्यामागे आपली ताकद उभी केल्यानं भाजपला ते साध्य होत नाहीये. नव्यानं पत्रकारितेत आलेल्यांना भाजपचा हा घोषा खरा असल्याचं वाटतं म्हणून तो इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न…!

शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा काँग्रेसचे रामराव आदिक उपस्थित होते. त्यापूर्वी १३ ऑगस्ट १९६० रोजी दादरच्या बालमोहन हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्तेच ‘मार्मिक’चे प्रकाशन झालं होतं. तिथं हिंदुत्वाचा कोणताही विषय नव्हता. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी, हित रक्षणासाठी झाली होती. १९६७ मध्ये शिवसेनेनं ठाणे नगरपालिकेत ४० पैकी १७ जागा मिळवल्या, वसंतराव मराठे पहिले नगराध्यक्ष झाले. ठण्याच महापालिकेत रूपांतर झाल्यावर सतीश प्रधान पहिले महापौर झाले. ते मराठी माणसाचा अजेंडा ठेवूनच! तेव्हा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. ठाण्याच उदाहरण यासाठी दिलं की, एकनाथ शिंदे यांच्या पूर्वीही ठाणे अस्तित्वात होतं आणि त्यावर बाळासाहेबांचाच प्रभाव होता हे लक्षात यावं! १९६८ साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यावेळी १२१ पैकी ४२ जागा मिळवल्या. तेव्हा शिवसेनेनं प्रजा समाजवादी पक्ष-प्रसपशी युती केली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष आणि जे.बी. कृपलानी यांचा किसान मजदूर प्रजा पक्ष यांच १९५२ ला विलीनीकरण होऊन प्रसपची स्थापना झाली होती. प्रसपचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. १९७३ मध्ये शिवसेनेनं भारतीय रिपब्लिकन पक्षाशी रा.सू. गवई गटाशी युती करून मुंबई महापालिकेच्या ३९ जागा मिळवल्या. रिपब्लिकन पक्षाचा हिंदुत्वाशी सुतराम संबंध नव्हता! १९७४ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत मध्य मुंबईतून रामराव आदिक काँग्रेस उमेदवार होते. त्यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला. कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार डांगे कन्या रोझा देशपांडे यांनी आदिकांचा पराभव केला, परंतु तरीही १९७७ साली बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या मुरली देवरांना महापौरपदासाठी पाठिंबा दिला. तेव्हा ‘हिंदुत्व संपलं’ अशी बोंब कुणी मारली नव्हती. जनता पक्षात संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघही विलीन झाला होता, तेव्हा जनसंघानं आपलं हिंदुत्व जानव्यासकट खुंटीला बांधलं होतं का? १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला. तसंच १९७८ च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच समर्थन केलं होतं. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं भागच घेतला नाही. तर १९७८ मध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले, पण त्यापैकी कोणीही निवडून आलं नाही. काँग्रेसची शिवसेनेची तेव्हापासूनची दोस्ती आहे..

१९८० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं जाणीवपूर्वक आपले उमेदवार उभे केले नाहीत आणि काँग्रेसचा प्रचार केला. त्या बदल्यात शिवसेनेला विधान परिषदेवर तीन जागा मिळाल्या. १९८२ मध्ये गिरणी संप काँग्रेसनं व्यवस्थित हाताळला नाही. तेव्हा गिरणगावात काँग्रेसला पाठींबा देणं तोट्याच ठरेल, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेसशी संबंध तोडले. याचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता! एकेकाळी शिवसेनेनं मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला, नंतर सुधीर जोशी मुंबईचे महापौर झाले. १९७९ मध्ये शिवसेना आणि मुस्लिम लीगचे नेते एकाच व्यासपीठावर दिसले. मुस्लिम लीगला हिंदुत्वाच काहीच देणंघेणं नव्हतं. शिवसेना आणि मुस्लिम लीगची संयुक्त सभा मुंबईच्या नागपाड्यातल्या मस्तान तलाव पटांगणात झाली, तेव्हा शिवसेना झिंदाबाद, मुस्लिम लीग झिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या. व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख आणि मुस्लिम लीगचे जी.एम. बनातवाला हे उपस्थित होते. तसंच वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सतीश प्रधान, दत्ताजी साळवी, जिलानी, झैदी, साबीर शेख, छगन भुजबळ, दत्ता नलावडेही हजर होते. शिवसेनेनं मुस्लिम लीगशी दोस्ती केली. शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकसाथ लढा उभारतील, आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूनं आणि देवाणघेवाणीतून झाली नाही, असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यावेळी या मंडळींना कोणीही ‘देशद्रोही’ संबोधण्याची हिम्मत केली नव्हती.

१९६७ साली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स.का.पाटील यांनी माजी सनदी अधिकारी स.गो.बर्वे यांना लोकसभेची उमेदवारी दिली, त्यावेळी शिवसेनेनं आपला ‘महाराष्ट्रद्रोही’ सदोबा पाटलांना असलेला विरोध बाजूला ठेवून, बर्वेंना पाठींबा दिला. १९७७ मध्ये शिवसेना आणि दलित पॅंथर यांची अशीच अल्पकाळ युती झाली. नामदेव ढसाळ यांना बाळासाहेबांनी जवळ केलं होतं. नामदेवचा ‘सामना’ मधला ‘सर्व काही समिष्टीसाठी’ हा कॉलम अत्यंत लोकप्रिय होता. आपलं हिंदुत्व शेंडी आणि जानव्याच नाही हे शिवसेनेनं दाखवून दिलं होतं. आजही अर्जुन डांगळे यांच्यासारखे नामवंत साहित्यिक शिवसेनेबरोबरच आहेत. डांगळेंसारखे तत्त्वांना धरून चालणारे नेते अजून सक्रिय आहेत. १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या आणीबाणीला शिवसेनेनं पाठिंबा दिला. १९८० मध्ये बाळासाहेबांनी आपले मित्र असलेल्या ए.आर. अंतुले यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. एवढंच नव्हे, तर श्रीवर्धनमध्ये त्यांचा प्रचारही केला. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची विशेष दोस्ती होती. त्यामुळं झुकतं माप शिवसेनेला मिळत होतं म्हणून मग शिवसेनेला तेव्हा वसंतसेना म्हटलं जातं असे. १९८५ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि मुंबई काँग्रेसचे मुरली देवरा यांचे संबंध बिघडलेले होते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ‘मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव’ असल्याचा आरोप दादांनी केला आणि त्यानंतर मराठी माणसांनी शिवसेनेच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता दिली! म्हणजे ही सत्ता मिळण्याला तेव्हा काँग्रेसची मदतच झाली होती. १९८२ मध्ये शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते. त्यांचा हिंदुत्वाशी दूरूनही संबंध नव्हता.

२००७ मध्ये प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं भाजपशी युती असतानाही पाठींबा दिला. २०१२ मध्ये प्रणव मुखर्जींनाही असाच पाठिंबा दिला. भाजपनं तेव्हा प्रणवबाबूंना नाही, तर पी. ए. संगमा यांना पाठिंबा दिला होता! आज शिंदे गटाला किंवा भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही. त्यांना कुठल्याही मार्गानं सत्ता मिळवायची होती. आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी महाशक्तीच्या दादागिरीला अजिबात जुमानलं नसतं. उलट लत्ताप्रहार करून ते बाहेर पडले असते. नाटकीपणे अहोरात्र बाळासाहेबांचा जप करणाऱ्यांना, ‘उद्धव आणि आदित्यला सांभाळा…!’ हे बाळासाहेबांच कळकळीच आवाहन मात्र सोयीस्करपणे आठवत नाही. परंतु त्या आवाहनाची आठवण आजदेखील लाखो शिवसैनिक तसंच शिवसेनाप्रेमींना आहेच आहे. हिंदुत्ववादाची झूल पांघरून शिंदे यांनी भाजपच्या साथीनं आपला डाव साधला असला, तरी सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिक त्यांचा डाव आणि लबाडी पुरती ओळखून आहेत. दोन गुजराथ्यांच्या तालावर आणि नागपुरी बँडवर ‘आवो मारी साथे…!’ करत त्यांनी कितीही फेर धरला, तरी या अट्टल बदमाषीला सामान्य जनता बिलकुल भुलणार नाही!

हिंदुत्वासाठी बाळासाहेबांना शिक्षा…!
१९८७ मधली विलेपार्लेची काँग्रेस आमदार हंसराज भुग्रा यांच्या निधनाने झालेली पोटनिवडणूक. काँग्रेसचे प्रभाकर कुंटे, धर्मनिरपेक्ष जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा आणि शिवसेनेचे डॉ. प्रभू अशी लढत झाली. व्होरा यांना भाजपनं शिवसेनेच्या विरोधात पाठींबा दिला होता. यात शिवसेनाप्रमुखांनी ‘गर्वसे कहो हम हिंदू है…! अशी घोषणा दिली. शिवसेनेचे प्रभू विजयी झाले. मग काँग्रेसच्या प्रभाकर कुंटेंनी न्यायालयात धाव घेतली. धर्मावर मतं मागितली म्हणून डॉ. प्रभू यांची निवड रद्द केली. शिवाय निवडणूक आयोगानं शिवसेनाप्रमुखांचा ६ वर्षासाठी मतदानाचा अधिकार गोठवला. हिंदूत्वावर लोक मतं देतात हे दिसून आल्यानं प्रमोद महाजनांनी शिवसेनेशी युती करण्याबाबत गळ वरिष्ठ नेत्यांना घातली. तेव्हा भाजप ‘गांधीवादी समाजवाद’ कुरवाळून वाटचाल करीत होती. हरियाणातल्या पंचमढी इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याला मान्यता घेण्यात आली. ही युती दोन तीनदा ब्रेक होत ती ३० वर्षे टिकली…. आज हिंदुत्व, बजरंग बली, धार्मिक ध्रुवीकरण याचा मतांसाठी जयघोष होत असताना मात्र निवडणूक आयोग डोळे झाकून शांत आहे, त्यावर कारवाई नाही…..!

  • हरीश केंची (जेष्ठ पत्रकार)