भारतीय राज्यघटनेने धर्म, जन्मस्थान, जात किंवा भाषा या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. देशाला राष्ट्रभाषा नसून २२ राज्यभाषा आहेत आणि या राज्यभाषांचा आदर राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. आपण ज्या राज्यात राहतो, ज्या राज्यामुळ आपली रोजी-रोटी चालते त्या राज्याची राज्याभाषा शिकणं, तिथली संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु, कायद्यातील या तरतुदींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण गेल्या काही वर्षांत मुंबईतच मराठी भाषेचा अपमान होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.
LinkedIn वर व्हायरल झालेल्या एका जॉब पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ITCODE Infotech ने ग्राफिक डिझायनरची जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. हे भारतीय राज्यघटनेने विहित केलेल्या मूल्यांच्या विरुद्ध आहे.
लिंक्डइनवरील एक जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली. जान्हवी सराना या नावाने लिंक्डइनवर एक जाहिरात करण्यात आली. त्यामध्ये मुंबईत ग्राफिक्स डिझायनरसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातील एका कार्यालयात ही नोकरी होती. तरीही या नोकरीच्या जाहिरातीत मराठी लोकांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं.
जाहिरातीतील तिच्या या सूचनेमुळे मुंबईतील मराठी माणसांच्या भावना दुखावल्या आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. नोकरीच्या निमित्ताने येथे परभाषिक लोकही वास्तव्यात आहेत. त्यामुळे हे शहर बहुभाषिक असलं तरीही प्रांतरचनेनुसार मराठी ही येथील राज्यभाषा आहे. असं असतानाही एखाद्या शहरात त्याच शहराच्या भाषेला नाकारण्यात आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय.
ITCODE Infotech या कंपनीसाठी ही जाहिरात करण्यात आली होती. ही सूरतची कंपनी असल्याचं फ्री प्रेस जर्नलने म्हटलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा संताप अधिक उफाळला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित एचआर व्यक्तीने ही पोस्ट डिलिट केली आहे. तसंच, माफी मागण्यासाठी दुसरी पोस्टही लिहिली आहे.
मी माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक्स डिझायनरच्या जागेसाठी जाहिरात दिली होती. पण जाहिरातीतील एका वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. कोणत्याही भेदभावाला मी खतपाणी घालत नाही, असं तिने लिहिलं आहे