अग्न‍ि प्रतिबंधात्मक उपाययोजना नसलेल्या चार मिळकती सिल…, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांच्या मागणीला यश

0
345

मनपाच्या अग्निशमन विभागाने बजावलेल्या नोटिसावर कोणतीही कार्यवाही न केल्याने कारवाई…

पिंपरी, दि. ३ पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील मिळकतींच्या सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरामध्ये औद्योगिक व व्यावसायिक मिळकतींना आग लागल्याने जीवित व वित्तहानीच्या घटना घडत असून अग्निशमन विभागाने घटना घडण्यामागील कारणांचे अवलोकन केले आहे. त्यानुसार, मनपा क्षेत्रातील बहुतांश व्यवसायिक मिळकतींमध्ये अग्न‍ि प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्यामुळे सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच व्यवसायाच्या ठिकाणीच वास्तव्य, धोकादायक पदार्थांचा साठा ई. केल्याचे दिसून आहे आहे. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये याकरीता पिंपरी चिंचवड शहरातील आद्योगिक, व्यावसायिक मिळकतींमध्ये अग्निप्रंतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण सुरु आहे. दरम्यान, या विषयावर स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी सलग तीन वेळा विविध घटनांबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले आणि पाठपुरावा केला होता. आयुक्त शेखर सिंह यांनी त्याची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.

पुर्णानगर येथील दुकानाच्या पोटमाळ्याला आग लागून चार जणांचे एक कुटुंब बळी गेले होते. चिखली-तळवडे येथे नंतर मेनबत्तीच्या कारखान्यात आग लागून सात महिला जळून मृृत पावल्या. वाल्हेकरवाडी येथे जुन्या फर्निचरच्या दुकानात आग लागून दोघा भावांचा करून अंत झाला. अशा सर्व घटनांची वेळोवेळी दखल घेऊन शहरातील सर्व आस्थापनांचे फायर ऑडिट करण्याची मागणी सिमा सावळे यांनी केली होती. आयुक्त शेखर सिंह यांनी त्यानंतर तत्काळ सर्वेक्षण हाती घेतले आणि जिथे फायर सेफ्टी मेजर नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

सर्वेक्षणामध्ये, मनपा क्षेत्रातील व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक, संस्थात्मक व वैद्यकिय इमारतींचे अग्नि प्रतिबंधात्मक सर्वेक्षण झालेल्या मिळकतीपैंकी धोकादायक मिळकतींची ओळख पटवून मिळकतीमध्ये अग्निशमन यंत्रणांची उपलब्धता, ये-जा करण्याचा सुरक्षित मार्ग, धोकादायक पदार्थांचा साठा. मिळकतीमध्ये निवासी वास्तव्य इत्यादी बाबींचा विचार करुन मिळकतधारकांना आत्तापर्यंत दोन वेळा नोटिस बजाविण्यात आल्यानंतर काहींनी त्याबाबत पुर्तता सुध्दा केली. परंतू, त्यानंतरसुध्दा सदर मिळकतधारकांनी कोणताही प्रतिसाद न देऊन कोणतीही कार्यवाही न केलेल्या मिळकतींवर पाणी व वीज पुरवठा बंद करुन चिखली व तळवडे भागातील चार मिळकती सिलबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढेही ज्या मालमत्ता कोणतीही कार्यवाही करणार नाहीत अशा मिळकती सिलबंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र विभागाकडे सादर करण्याची जबाबदारी इमारतीचा मालक व भोगवटादाराची…
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अधिनियमातील कलम ३(१) प्रमाणे कोणत्याही इमारीतीमध्ये किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, तसेच कलम ३(३) नुसार, लायसन्स प्राप्त एजन्सीकडील असणाऱ्या नमुन्यातील व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मनपा अग्निशामक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किेंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची असल्याचे सुध्दा विभागाने स्पष्ट केले आहे.

कारवाई यापुढे सुद्धा सुरू राहणार…
पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शाळा, रुग्णालये आदी सार्वजनिक ठिकाणी आगीच्या घटना घडून कोणतीही जीवित व वित्त हानी टाळणे हेच महानगरपालिकेचे ध्येय आहे. त्यासाठीच महानगरपालिका सर्वेक्षणाच्या माध्यमातून काम करीत आहे. परंतू, शहरातील ज्या व्यवसायिक मिळकतधारकांच्या कोणत्याही प्रकारची सुचविलेली कार्यवाही होत नसल्याने मिळकती सीलबंद करण्याची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यवसाय अग्निसुरक्षा पुर्तता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्या…
शहरातील सर्व औद्योगिक, वाणिज्यीक, शाळा, रुग्णालये इत्यादी व्यवसायीकांनी महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस, महाराष्ट्र शासन यांनी नियुक्त केलेले फायर लायसेंसिंग एजन्सीमार्फत त्यांच्या व्यवसायिक इमारतीमध्ये नियमानुसार आवश्यक अग्निशमन यंत्रणा बसवून घ्यावी. त्याबरोबरच मनपाच्या अग्निशामक विभागकडे अर्ज करुन व्यवसाय अग्निसुरक्षा पुर्तता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. असेही विभागाकडून व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे.

अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना नसलेल्या चार मिळकती सिल, कारवाई स्वागतार्ह – स्थायी समिती माजी अध्यक्षा सिमा सावळे

मी केलेल्या मागणीची दखल महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तत्काळ घेतली म्हणून त्यांचे आभारी आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी धडाकेबाज कारवाई झाली आहे त्याचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. आजवरज्या दुर्घटना झाल्यात त्या केवळ निष्काळजीपणामुळे झाल्यात. पुर्णानगर, तळवडे, चिखली,वाल्हेकरवाडी अशा आगीच्या घटनांत निष्पाप जिवांचा बळी गेला. आगीच्या घटनाटाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत महत्वाच्या आहेत. लोक नियम, निकष पाळतनसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. यापुढेही कारवाईत सातत्य ठेवावे,अशी प्रशासनाला विनंती आहे. यापुढील काळात आगीच्या मोठ्या दुर्घटना कमी होतील आणि निष्पापजीव वाचतील. – सिमा सावळे, स्थायी समिती माजी अध्यक्षा