सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शौचालय घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असतानाच आता पुन्हा एफएसआय प्रकरणात त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास सातारा लोकसभा मतदारसंघातील ही मोठी राजकीय घडामोडी म्हणावी लागेल. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होईल का? अशी चर्चा आता या मतदारसंघात रंगली आहे.
या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये 24 संचालक आणि सचिव अशा एकूण 25 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्हा नुसार येथील मसाला मार्केट मधील 466 गाळेधारकांना जास्तीचा एफएसआय देताना एपीएमसी प्रशासनाचे 65 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये या गाळेधारकांना सहाशे रुपये चौरस फुटाणे परवानगी देण्यात आली होती. वास्तविक त्यावेळी रेडीरेकनरचा दर हा 3066 रुपये होता. मात्र, असे असताना केवळ सहाशे रुपये आकारले गेल्याने या प्रकरणात शासनाचे 62 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
एका प्रकरणात दिलासा मिळताच दुसरे प्रकरण समोर
महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना एपीएमसी फळ मार्केटमध्ये शौचालय टेंडरच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाच्या वतीने अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये दिलासा मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, या प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर आता दुसरे प्रकरण समोर उभे राहिले आहे. आता या प्रकरणात शशिकांत शिंदे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शशिकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम सातारा लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.