दि २८एप्रिल (पीसीबी ) पिंपरी – महाराष्ट्रातील प्रतिष्ठित लढत म्हणून शिरूर लोकसभेच्या लढतीकडे बघितलं जात आहे. शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील अशी थेट लढत आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. परंतु, अमोल कोल्हे यांना गावकऱ्यांच्या रोषाला समोर जावं लागत आहे. कोल्हे हे गेल्या पाच वर्षात मतदारसंघात दिसलेच नाहीत, अस गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तशी वारंवार अजित पवार आणि शिवाजी आढळराव पाटील यांनीही टीका केलेली आहेच. याचा प्रत्यय अमोल कोल्हे यांना प्रत्येक्षात निवडणुकीत येत आहे. यावरूनच अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
कोल्हे यांनी गावकऱ्यांच्या रोषाचं खापर शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर फोडलं आहे. आढळराव पाटील यांनी ही कोल्हेंना जशास तसं उत्तर दिलं आहे. गेली पाच वर्षे अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकलेच नाहीत. त्यांना तोंड दाखवायला जागा नाही, असा जोरदार हल्लाबोल कोल्हेंवर केला आहे.
शिरूर लोकसभेत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना प्रचारादरम्यान गावकऱ्यांच्या रोषाला समोर जावं लागत आहे. ‘गेल्या पाच वर्षात करंदी गावासाठी काय केलं?’ असं विचारत कोल्हेंना जाब विचारण्यात आला. दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे समोरून जात असताना मोदी- मोदींच्या घोषणा दिल्या जात आहेत. यावरून अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव यांच्यावर निशाणा साधला असून व्हिडिओ काढणारे आणि बोलणारे हे आढळराव यांची माणसं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाजी आढळराव यांनी ही पलटवार केला असून त्यांनी कोल्हे यांना चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
अमोल कोल्हे गेली पाच वर्षे झालं एका ही गावात गेले नाहीत. त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. त्यांना सांगायला काहीच नाही. लोकसभेत १ हजार ८२५ दिवसांमध्ये १६१ दिवस हजर आहेत. बाकीचे १ हजार ७०० दिवस कुठे आहेत. असा प्रश्न शिवाजी आढळराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. माणसं पेरणे हा अमोल कोल्हेंचा व्यवसाय आहे. असले धंदे करायला मला वेळ नाही. अशी खालची पातळी गाठून काम करत नाही. अमोल कोल्हे हे बालिश बुद्धीचे आहेत. असं ही शिवाजी आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.