काँग्रेस प्रेम एकाशी, लग्न दुसऱ्याशी व संसार तिसऱ्याशी करतात तर भाजप कुणाचं फुटलं, कुणाचं फाटला, कुणाचा डिव्होर्स होत आहे, डिव्होर्स होत नसेल तर घ्यायला लावतात. तर काही घरफोडे पक्ष आहेत. सत्तेसाठी पक्ष फोडायला लागले आहे. नितिशून्य, माणुसकीहीन नितीमत्ता नसलेले पक्ष उद्या देश फोडायला मागे पुढे बघणार नाही अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारासाठी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडांगणावर प्रचार सभा झाली. याप्रसंगी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व काँग्रेस पक्षावर टीका केली. काँग्रेसचे उमेदवार पळकुटे आहेत. शरद पवार व उध्दव ठाकरे यांना लोकसभेसाठी उमेदवार मिळत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाजपचे की काँग्रेसचे हे कळायला मार्ग नाही तर भाजप हा फोडाफोडीचे राजकारण करीत आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
लोकवर्गणीतून निवडणूका व्हाव्या ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. मात्र आज निवडणुकीत भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे. मोदी यांनी निवडणुकीकरिता कोणाकोणाकडून इले्ट्रोल बाँडच्या माध्यमातून निधी घेतला हे समोर आले आहे. मात्र काँग्रेस यावर लढायला तयार नाही. बोफर्स कांडच्या नावाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना बदनाम करण्यात आले. बोफर्स कांड मधून पैसे आले की नाही हे माहिती नाही मात्र बाँडचे पैसे जमा झाले ही माहिती न्यायालयाने समोर आणली आहे, असेही आंबेडकर म्हणाले.