मुंबई, दि. १९ (पीसीबी) – सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अशातच आता भाजपकडून राज ठाकरेंना महायुतीत सामील करून घेण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपला आता उद्धव ठाकरेंची ताकद कळून चुकली असल्याचं वक्तव्य ठाकरेंच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, “महाविकास आघाडीत सध्या अतिशय उत्तम वातावरण आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोण कोणाशी युती करते यापेक्षा आमची ताकद कशी वाढेल यावर आमचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे हे भाजपसोबत असताना त्यांना कोणाची गरज पडली नाही. मात्र, आता त्यांना उद्धव ठाकरेंचं महत्त्व कळून चुकलं असेल.
उद्धव ठाकरे यांची भरपाई करण्यासाठी पहिल्यांदा त्यांना शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं लागलं. त्यानेही भागलं नाही म्हणून राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवलं. त्यानंतरही त्यांना काँग्रेस फोडावी लागली. शिवाय आता मनसेलाही सोबत घेत आहेत. त्यामुळे एकट्या उद्धव ठाकरेची ताकद किती होती हे आता भाजपला समजलं असेल.”
कल्याण लोकसभेसाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारलं असता ते म्हणाले, “पक्षाने मला सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्यासाठी मी काम करत आहे. या अगोदर आम्ही दहा मतदारसंघांमध्ये मेळावे घेतले आहेत. तसेच कल्याणच नव्हे, तर ज्या ज्या ठिकाणी आमचा उमेदवार असेल त्याला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सगळे मिळून विजयी करू.” रामटेकच्या जागेबाबात बोलताना सरदेसाई म्हणाले, “रामटेकमध्ये पदाधिकाऱ्यांनी मेळावे घेतले आहेत. रामटेक लोकसभा असो किंवा विधानसभा तिथे शिवसेनेची भरपूर ताकद आहे, हा शिवसेनेचा गड आहे. परंतु तिथे उमेदवार कोण असेल हे वरिष्ठ नेते ठरवतील.”