अजित पवार यांचा आज बारामतीत झंजावात

0
145

पुणे, दि. १४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्यात सभांचा धडाका लावणार आहेत. ते आज एकाच दिवशी सात सभा घेणार आहेत.

बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत. तर, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बारामतीत सभा, बैठका, मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. त्यात आता अजित पवार आज बारामती पिंजून काढणार आहेत.
गुरुवारी अजित पवार सुपे, कोऱ्हाळे बुद्रूक, झारगडवाडी, करंजेपूल, माळेगाव बुद्रूक, नीरा वागज व बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स या ठिकाणी सभा घेऊन आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी यांनी देखील बारामती दौरा करून विविध मेळाव्यांना संबोधित केल्याचे पाहायला मिळालं. बारामतीच्या मैदानात खुद्द शरद पवार उतरल्याने अजित पवार गटांमध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्या खेळीमुळे वातावरण शरद पवार गटासाठी पोषक होण्याची शक्यता असल्याने अजित पवार देखील बारामती मध्ये पूर्णपणे ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळत आहेत.