भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
294

आंबेठाण, दि. १० (पीसीबी) – भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. वाहनाचे चाक दुचाकीस्वार व्यक्तीच्या कमरेवरून आणि पोटावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजता आंबेठाण येथे घडला.

प्रशांत अन्ना इंगळे (वय 30, रा. गाजीपूर, टाकळी, गोरेगाव, जि. अकोला) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक विनायक संतोष गायकवाड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत इंगळे हे खेड तालुक्यातील आंबेठाण येथून त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 30/बीजे 3520) जात होते. त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यामध्ये प्रशांत हे रस्त्यावर पडले. त्यानंतर अज्ञात वाहनाने चाक प्रशांत यांच्या कमरेवरून आणि पोटावरून गेले. यात ते गंभीर जखमी झाले. प्रशांत यांना जखमी अवस्थेत सोडून आरोपी वाहन चालक पळून गेला. दरम्यान, गंभीर जखमी झाल्याने प्रशांत यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.