चाकण, दि. १२ (पीसीबी) – रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी व्यक्तीला भरधाव जाणाऱ्या बसने धडक दिली. यामध्ये वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. 10) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडला.
मच्छिंद्र तुकाराम रौंधळ (वय 68, रा. आंबेठाण चौक, चाकण) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश मच्छिंद्र रौंधळ (वय 38) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मच्छिंद्र रौंधळ हे शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तळेगाव येथे जाण्यासाठी तळेगाव चौकात रस्ता ओलांडत होते. रस्ता ओलांडत असताना तळेगावकडून चाकणच्या विरुद्ध दिशेने आलेल्या एका भरधाव खासगी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात मच्छिंद्र रौंधळ यांच्या हाताला, डोक्याला, बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर बस चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.










































