मंदिर झाले आता मशीद बांधली जाणार

0
266

अयोध्या, दि. २२ (पीसीबी) – अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर हे प्रकरण अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात अडकलं होतं. अखेर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकल देत वादग्रस्त जागा ही रामजन्मभूमी असल्याचा निर्वाळा दिला. त्याचवेळी वादग्रस्त जागेपासून काही अंतरावरील जमीन ही मुस्लीम पक्षकारांना दिली आहे. या जागेवर मोठी मशीद बांधली जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिर बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असलं तरी मशिदीचं काम अद्याप बाकी आहे. मे २०२४ पासून या मशिदीच्या बांधकामास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन मे महिन्यापासून अयोध्येत भव्य मशीद बांधण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. ही मशीद बांधून तयार होण्यास तीन ते चार वर्षे लागतील.

इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, येत्या मे महिन्यापासून अयोध्येतील मशिदीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या मशीद विकास समितीचे प्रमुख हाजी अरफात शेख म्हणाले, मशीद उभारण्यासाठी पैसे जमवण्याचं काम सुरू केलं जाणार आहे. यासाठी लोकांकडून देणग्या स्वीकारल्या जातील. निधी संकलनासाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार केलं जाऊ शकतं.

शेख म्हणाले, मोहम्मद पैगंबर यांच्या नावावरून मशिदीला नवीन नाव दिलं जाईल. ‘मशीद मोहम्मद बिन अब्दुल्लाह’ असं नाव या मशिदीला दिलं जाईल. अरफात शेख म्हणाले, लोकांमधील वैर, द्वेष संपवून त्याचं प्रेमात रुपांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असो अथवा नसो, आपण आपल्या मुलांना चांगल्या गोष्टीच शिकवल्या पाहिजेत तसं केल्यास समाजांमधला संघर्ष थांबेल.

सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांना अयोध्येतील धन्नीपूरमध्ये जमीन दिली आहे. या धन्नीपूरमध्ये मशिदीचे बांधकाम करणाऱ्या इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनने निधी संकलनासाठी फेब्रुवारीपासून वेगवेगळय़ा राज्यांमध्ये प्रभारी नियुक्त करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या संस्थेचे मुख्य विश्वस्त आणि उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर फारूकी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, आतापर्यंतच्या योजनेनुसार धन्नीपूरमधील पाच एकर जागेवर मशिदीचे बांधकाम मे महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. मशिदीचा अंतिम आराखडा फेब्रुवारीपर्यंत आपल्यासमोर असेल.