ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन

0
202

पुणे, दि. १३ (पीसीबी) – ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचं निधन झालं. प्रभा अत्रे यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून प्रभा अत्रे या रसिकांच्या स्मरणात राहतील. ‘ख्याल’ गायकीसह ‘ठुमरी’, ‘दादरा’, ‘गझल’, ‘उपशास्त्रीय संगीत’, ‘नाट्य संगीत’, ‘भजन’ व ‘भावसंगीत’ गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होतं. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे.आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करत असत. त्यांच्या काही रचना, मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’, यांचे सूर आजही रसिकांच्या कानात घुमत आहेत. आज या स्वरयोगिनीची स्वरसाधना शांत झाली आहे.

डॉ. प्रभा अत्रे यांची अमेरिकास्थित भाची पुण्यात आल्यानंतर मंगळवारी (१६ जानेवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यानुसार अंत्यदर्शनाची वेळ कळवण्यात येईल, अशी माहिती स्वरमयी गुरुकुल संस्थेचे प्रसाद भडसावळे यांनी दिली. स्वरयोगिनी, संगीत विचारवंत, लेखिका-कवयित्री अशी बहुआयामी ओळख असलेल्या डॉ. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या बुजुर्ग गायिका होत्या. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांना घराणेदार गायकीची तालीम मिळाली. त्यामध्ये आपल्या प्रतिभेचे रंग भरत त्यांनी गायकी समृद्ध केली. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना १९९० मध्ये पद्मश्री आणि २००२ मध्ये पद्मभूषण किताबाने सन्मानित केले. २०२२ मध्ये ‘पद्मविभूषण‘ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी तसेच पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अत्रे यांची संगीतावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर डाॅ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता होत असे.

डॉ. प्रभा अत्रे यांचा शास्त्रीय संगीतावर गाढा अभ्यास
भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर डॉ. प्रभा अत्रे यांचा गाढा अभ्यास होता. विदेशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकवलं. प्रभा अत्रेंनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी संगीत शिकण्याचा निर्णय घेतला. प्रभा अत्रेंच्या निर्णयाला त्यांच्या घरातून विरोध झाला नाही. खरंतर वयाच्या आठव्या वर्षापासूनच गाणं त्यांच्या आयुष्यात आलं. आई इंदिरा अत्रे यांच्या गाण्यामुळे त्या प्रेरित झाल्या. पंडित सुरेश माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या त्या शिष्या होत्या.

प्रभाताईंनी ‘अपूर्व कल्याण’, ‘मधुरकंस’, ‘पटदीप’ – ‘मल्हार’, ‘तिलंग’ – ‘भैरव, भीमकली’, ‘रवी भैरव’ यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे.
तरुण वयात प्रभाताईंनी ‘संगीत शारदा’ ,’संगीत विद्याहरण’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘बिरज बहू’, ‘लिलाव’ यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. १९५५ पासून त्या विविध आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत होत्या. भारताच्या व विदेशांतील अनेक ख्यातनाम आणि महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभाताई अत्रे यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे. किराणा घराण्याच्या गायिका प्रभाताई अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन सुद्धा केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवान्वित केले.

ती शेवटची भेट ठरेल असं वाटलं नव्हतं
गेल्याच महिन्यात २५ डिसेंबर २०२३ ला पुण्यात त्यांना अटल संस्कृति पुरस्कार प्रदान केला, तेव्हा तीच शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.