“अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील” – शालिनीताई पाटील

0
203

सातारा, दि. २६ (पीसीबी) – अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यापासून माजी खासदार शालिनीताई पाटील या अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी पुन्हा पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील”, असा दावा पाटील यांनी केला आहे. तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं पाटील म्हणाल्या.

अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबर गेल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर शालिनीताई म्हणाल्या, तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तुरुंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवार तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही. शालिनीताई पाटील मुंबई तकशी बोलत होत्या.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील असं बोललं जात आहे. याबाबत शालिनीताई म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदेदेखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील. कारण, एकनाथ शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. ते शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आहेत. ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. परंतु, त्यांना सरकार चालवता येत नाही.