उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश

0
402

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, संपर्कनेते सचिन आहिर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुलभा उबाळे, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले आदी उपस्थित होते.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून पवार यांना शिवसेनेची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे समजले.भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्याचा पवार यांनी नुकताच राजीनामा दिला होता. तसेच, आपण दि. २५ ऑक्टोबर रोजी म्हणजे त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाशी पुढील भूमिका जाहीर करणार असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हेते.

एकनाथ पवार हे पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी एकदा भाजपाच्या उमेदवारीवर भोसरी विधानसभेची निवडणुकही लढविली होती. त्याचबरोबर पक्षाचे सभागृह नेते म्हणुन त्यांनी पक्षासाठी चांगली जबाबदारी पार पाडली होती. पक्षातील ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांचे ते निकटवर्ती आहेत. त्याच बरोबर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांचेशी त्यांचे चांगले संबंध आहेत. स्मृती ईराणी यांच्या अमेठी लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्यावेळी त्यांनी तेथे जावून महत्वपूर्ण कामगीरी पार पाडली होती.

दरम्यान, एकनाथ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, एकनाथ पवार हे लोहा कंधार विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या या मतदार संघात शिवसेनेची चांगली ताकद असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील ४०० गावे त्यांना आतापर्यंत पायी फिरून पिंजून काढली आहेत. गावागावांतून बैठका घेत मतदारसंघाची बांधनी त्यांनी केल्याने विधानसभेसाठी त्यांचे नाव निश्चित समजले जाते