गुजरात,दि.२२(पीसीबी) – गुजरातमध्ये नवरात्रीनिमित्त गरबा खेळत असताना आणखी एका 17 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत गरबा खेळताना हार्ट अटॅकने 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
गरबा खेळत असताना 17 वर्षीय वीर शहाला हार्ट अटॅक आला आणि रक्तस्त्राव सुरू झाला. वीर शहाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वीरने नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गरब्यात भाग घेतला. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. सर्वांनाच धक्का बसला आहे. वीरच्या मृत्यूनंतर गरबा आयोजकांनी कार्यक्रम बंद केला. या संपूर्ण घटनेची माहिती वीरचे वडील रिपल शहा यांना देण्यात आली.पालकांना वीरची माहिती मिळताच ते दोघेही तात्काळ पोहोचले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर रिपल शहा आणि त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. हात जोडून सर्व तरुणांना गरबा खेळताना स्वतःची काळजी घ्यावी आणि खेळताना ब्रेक घ्यावा, असं आवाहन रिपल शहा यांनी केलं आहे.
गुजरातमध्ये सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, याच काळात गरबा खेळताना तरुणांना हार्ट अटॅक आल्याच्या घटनाही समोर येत असून, गेल्या 24 तासांत विविध ठिकाणी एकूण दहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवरात्रीच्या 6 दिवसांत 108 आपत्कालीन रुग्णवाहिकांना केवळ हृदयाशी संबंधित प्रकरणे आणि श्वासोच्छवासाच्या समस्येसाठी 521 कॉल आले आहेत. वीर शहाच्या मृत्यूपूर्वी अहमदाबादमधील 24 वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना पडून अचानक मृत्यू झाला होता. बडोद्यातील डभोई येथे गरबा खेळताना हार्ट अटॅकने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
गरबा खेळताना कपडवंज येथील 17 वर्षीय सगीरचाही मृत्यू झाला आहे. बडोद्यातील एक 55 वर्षीय व्यक्तीचा आपल्या सोसायटीत गरबा खेळत असताना अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला. गरबा खेळताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना राजकोटमध्ये देखील घडली आहे.