भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे 1200 चे तिकीट 12 हजारांना विकणाऱ्या दोघांना अटक

0
661

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी

गहुंजे, दि. २० (पीसीबी) – गहुंजे येथे होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे 1200 रुपयांचे तिकीट तब्बल 12 हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मुकाई चौक, रावेत येथे बुधवारी (दि. 18) रात्री केली. तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना तिकिटे पुरवणाऱ्या त्यांच्या साथीदाराच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या क्रिकेट वर्ल्डकपचे सामने सुरु आहेत. त्यातील पाच सामने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीयमवर होणार आहेत. त्यापैकी भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला सामना गुरुवारी (दि. 19) झाला. त्यानंतरच्या चार सामन्यांमध्ये भारताचा एकही सामना नाही. भारताचा सामना असलेली गुरुवारची एकमेव मॅच आज होणार असल्याने क्रिकेट प्रेमींनी यासाठी तुफान गर्दी केली.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. सध्या वेशातील पोलीस मागील काही दिवसांपासून स्टेडीयम आवारात गस्त घालत आहेत. दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली की, मुकाई चौक, रावेत येथे कोहिनूर सोसायटीच्या समोर काही दलाल क्रिकेट सामन्याची तिकिटे जास्त दराने विकत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा लाऊन रवी लिंगप्पा देवकर, अजित सुरेश कदम या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याची 1200 रुपये दाराची पाच तिकिटे आढळली. यातील एक तिकीट ते तब्बल 12000 रुपयांना विकत होते. पोलिसांनी पाच तिकिटे, 38 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, सात हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 51 हजारांचा ऐवज जप्त केला.

रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने ही तिकिटे पुरवली असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे या तिघांवर रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.