जयंत पाटील म्हणाले, ’15 आमदार संपर्कात’

0
189

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मुंबईत आज महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत अनेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, असा निर्धार शरद पवारांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणारे केवळ ईडी, सीबीआयच्या भीतीने जाणारे लोक आहेत, असंही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीतीली इनसाईड स्टोरी समोर आलीय. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे”, असं मत काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडलं. “पण टीका केली नाही तर आपण सोबत आहोत हा मेसेज जाईल”, अशी समज वरिष्ठांकडून या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचं मत पाहता अजित पवार यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयानंतरही पक्षात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं चित्र दिसत आहे.

बारामतीची लढाई ही बारामती विरुद्ध दिल्ली अशी आहे. या लढाईसाठी सज्ज राहण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली. या सूचनेनंतर सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान, लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. “अजित पवार गटातील 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.