बोरवणकर यांच्याशी चर्चा केली हे मी कबूल करतो, मात्र …

0
286

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)- येरवाड्यामधील सरकारी भूखंड विकसनासाठी खासगी विकासकाला देण्याचा निर्णय तत्कालिन राज्य सरकारने घेतला होता. तो निर्णय मी घेतलेला नव्हता. माझ्यावर होत असलेल्या आरोपात तथ्य नाही, असं स्पष्टीकरण देत माझा त्या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. एखादा व्यक्ती पुस्तक लिहित असताना प्रसिद्धीसाठी काही खळबळजनक गोष्टी लिहिल्या की ते पुस्तक प्रकाशझोतात येते, तसा प्रयत्न यावेळी दिसून येतो, असा टोमणाही अजित पवार यांनी बोरवणकर यांना मारला.

पुण्यातील येरवाडा उपनगरातील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनीच २०१० मध्ये आपल्याला दिला होता, असा थेट आरोप माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपल्यावरील होणारे आरोप फेटाळून लावताना मी संबंधित प्रकरणी त्यावेळी बोरवणकर यांच्याशी चर्चा केली हे मी कबूल करतो, मात्र तो निर्णय घ्यायला मी कोणताही दबाव टाकला नाही. त्यांनी जागा देण्यास विरोध दर्शवल्यानंतर मी देखील पुन्हा त्यांना त्याविषयी त्यांना हटकले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना शहरातील अनेक प्रश्न असतात. संबंधित लोक जेव्हा तुम्हाला पालकमंत्री म्हणून एखादी गोष्ट सांगत असतात, त्यावेळी आढावा घ्यावा लागतो. तत्कालिन सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, गृह खात्याच्या निर्णयानंतर मी येरवाड्यामधील भूखंडाविषयी मीरा बोरवणकर यांना विचारलं. त्यावेळी त्यांनी भूखंड खासगी विकासकाला देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर मी कधीही त्या प्रकरणावरून त्यांना हटकले नाही, अशी स्पष्टोक्ती अजित पवार यांनी दिली. त्याचवेळी असे निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रिमंडळाला असतात. पालकमंत्री असे निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगायला देखील अजित पवार विसरले नाहीत.

माझ्यावर झालेल्या आरोपांनंतर विरोधी पक्ष माझ्या चौकशीची मागणी करू लागले आहेत. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. पण संबंधित भूखंड त्याच जागेवर आहे. त्या भूखंडाची मालकी शासनाकडेच आहे. मग कुणाची चौकशी करता? असा उलट सवाल अजित पवार यांनी केला. आरोप झालेल्या भूखंडाशी माझा काहीही संबंध नाही, मी भला आणि माझं काम भलं- असा माझा स्वभाव असल्याचं अजित पवार यांनी आवर्जून नमूद केलं.

दरम्यान, अजितदादांचे वर्चस्व भाजपमधील अनेक नेते मंडळींना मान्य होणारे नाही आणि तिथूनच त्यांना संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मीरा बोरवणकर प्रकरणालाही तोच वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र होणार आणि नंतर अजितदादा हेच मुख्यमंत्री होणार, अशी शक्यता वारंवार वर्तविली गेली. भाजपने तोच धस्का घेतला आणि मध्येच हे मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकाचे प्रकरण मीडियातून प्रकाशझोतात आले. दुसऱ्या पक्षातील बडे बडे लोकनेते आपल्याकडे घ्यायची आणि नंतर त्यांचे खच्चीकरण करायचे हा भाजपचा जुनाच फंडा आहे. अनेकांची घरे भाजपने फोडली. खडसे, मुंडे ही उदाहरणे ताजी आहेत. देवेंद्र फडणवीस यांची आणि ते ज्यांच्या सांगण्यावरून हे निर्णय घेतात त्या अमित शाह यांची तीच निती आहे. तीन महिन्यांत अजितदादांची प्रकरणे अचानाक बाहेर कशी आली याचा विचार आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. अजितदादांच्या अंगलट सगळे येते आहे. आता दादांची अवस्था सांगताही येत नाही आणि बोंबही मारता येत नाही अशी झालीय. फडणवीस यांनी विखेंसारखे घराने संपवले. मोहित्यांची वाट लावली. ठाकरे यांच्या सारखे महाराष्ट्राशी एकनिष्ठ खांदानाला धक्के दिले. शरद पवार यांच्या कुटुंबाचा चिराही हालत नव्हता, पण अजितदादांवर दबाव तंत्राचा वापर करून त्यांनाही शरण यायला भाग पाडले. तळागाळातील लोकनेते पंखाखाली घ्यायचे आणि त्यांना निष्प्रभ करायचे हे राजकारण घातकी आहे. दादांच्या बाबतीत भाजपकडून मीडियी ट्रायल सुरू आहे का, असाही संशय येतो.