पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची नुकतीच अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे विराट सभा झाली. त्यात त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला २२ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. याप्रश्नी सरकारवरील दबाव आणखी वाढविण्यासाठी ते पुन्हा काही अशा सभा घेणार असल्याचे समजते. राजगुरुनगर पाठोपाठ पिंपरी चिंचवड शहरात रेकॉर्डब्रेक सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे साखळी उपोषण राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे एक ऑक्टोबरपासून सुरू आहे. दररोज दोन-तीन गावांतील शे-दीडशे ग्रामस्थ त्यात भाग घेत आहेत. या आंदोलनाला विसाव्या दिवशी जरांगे-पाटील हे भेट देणार आहेत. त्यावेळी त्यांची तिथे जंगी सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी कालपासून सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रश्नी सरकारवरील दबाव आणखी वाढविण्यासाठी मराठा समाजाने आता स्वतःहून जरांगे पाटील या आपल्या नव्या हिरोच्या सभा २२ ताऱखेच्या आत घ्यायचे ठरविले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्येही मराठा आऱक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण झाले होते. त्यामुळे आपल्याकडेही जरांगे-पाटलांची सभा घेण्याचे तेथील मराठा क्रांती मोर्चाने ठरवले आहे. त्याच्या नियोजनाची बैठक मंगळवारी संध्याकाळी होत आहे. सरकारवर दबाव वाढवून आरक्षण मिळविणे हा हेतू त्यामागे असल्याचे या सभेच्या एका स्थानिक मराठा मोर्चाच्या कार्यकर्ता आयोजकाने ‘सरकारनामा’ला सांगितले.
शहरातील सर्वात मोठ्या सांगवी येथील पीडब्लूडी या मध्यवर्ती मैदानावर ही सभा घेण्याचे चालले आहे. त्यानंतर आणखी एक-दोन ठिकाणी जरांगे-पाटलांच्या सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. एकूणच पुन्हा त्यांची तोफ धडाडून मोठी वातावरण निर्मिती होणार असून, त्यातून सरकारची धडधड, मात्र आणखी वाढणार आहे.