भिडेंवरील कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
पिंपरी दि. 1(पीसीबी) – प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात संभाजी भिडेसारखे लोक थोर महात्म्यांबद्दल अवमानकारक टिप्पनी करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच आठवड्यात महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेचा बोलाविता धनी कोण आहे ते शोधून काढून संभाजी भिडे याला तात्काळ अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक समाजसुधारकांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करून संभाजी भिडे यांचा तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्या भिडेला अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.यावेळी, माजी नगरसेवक तथा कार्याध्यक्ष राहुल भोसले, शाम लांडे, माजी नगरसेवक विक्रांत लांडे,कार्याध्यक्ष फजल शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, सतीश दरेकर, संगीताताई ताम्हणे, युवतीच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यासह कविता खराडे, विजय लोखंडे, गोरक्ष लोखंडे, संजय औसरमल, विशाल काळभोर, अकबर मुल्ला, सचिन औटे, गंगा धेंडे, पुष्पा शेळके,मनीषा गटकळ, ज्योती गोफणे, युवराज पवार, किरण देशमुख, बाळासाहेब पिल्लेवार, प्रसाद कोलते, संतोष निसर्गंध, अक्षय माछरे, संगीता कोकणे, मीरा कदम, विजय दळवी, सुनिता अडसुळे, अरुणा कुंभार, सविता धुमाळ, ज्योती तापकीर, उज्वला ढोरे, आशा शिंदे, नीलम कदम, दिपाली देशमुख, इमरान शेख, रवींद्र सोनवणे, राजू चांदणे, अश्विनी जाधव, महेश माने, प्रवीण पिंजन, जया गवळी यांच्यासह पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित गव्हाणे म्हणाले, संभाजी भिडे याला राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे. ही वक्तव्ये जाणिवपूर्वक केली जात असून या माध्यमातून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आहे. या राज्यात संभाजी भिडेसारख्या अपप्रवृत्तींना थारा देता कामा नये. संभाजी भिडेसारख्या प्रवृत्ती या समाज भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत. संभाजी भिडेवर कारवाई करण्यास विलंब होत असून भिडेचा बोलविता धनी कोण आहे? ते देखील शोधून काढले पाहिजे. सातत्याने समाजसुधारकांचा अवमान करणाऱ्या भिडेला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही गव्हाणे यांनी यावेळी केली.संभाजी भिडे नव्हे मनोहर कुलकर्णी – कविता आल्हाटसंभाजी भिडे याने आपले स्वत:चे नाव बदलले असून त्याचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे. हा मनोहर कुलकर्णी समाजामध्ये तेढ निर्माण करून महापुरुषांचा अवमान करत आहे, ही बाब अत्यंत निंदनिय आहे. उच्च विद्याविभूषित असतानाही बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडेवर तात्काळ कारवाई करून त्याला अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी यावेळी केली.यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.