“स्वतःला विसरल्याखेरीज नवनिर्मिती अशक्य!” – बशीर मुजावर

0
387

‘चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचचा उपक्रम

पिंपरी, दि. १७ – “साहित्य, संगीत, कला या क्षेत्रांत स्वतःला विसरल्याखेरीज नवनिर्मिती अशक्य असते! त्यामुळे कलासर्जनात रममाण झालेला साहित्यिक अथवा कलावंत समाजाला आत्मकेंद्रित वाटतो; पण मनाची एकाग्रता साधताना नकळत तो त्या अवस्थेत पोहचलेला असतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक, संगीतकार, चित्रकार बशीर मुजावर यांनी पार्क व्ह्यू सोसायटी, साधू वासवानी बागेजवळ, पिंपरी येथे रविवार, दिनांक १६ जुलै २०२३ रोजी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध गझलकार रघुनाथ पाटील यांच्या हस्ते बशीर मुजावर यांचा पत्नी रजिया मुजावर यांच्यासह हृद्य सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांच्यासह शहरातील साहित्यिकांची मांदियाळी या सोहळ्यात सहभागी झाली होती.

संत सावता माळी यांच्या अभंगाचे तानाजी एकोंडे यांनी केलेल्या सुरेल गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यांना अशोकमहाराज गोरे यांनी तबलासाथ केली; तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी बशीर मुजावर यांच्या साहित्य, संगीत, चित्रकला, चित्रपटनिर्मिती, प्रकाशन अशा विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा विस्तृत आढावा घेतला. श्रीकांत चौगुले यांनी, “‘वर्तुळ’ या आपल्या पहिल्याच कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त करणारे बशीर मुजावर हे पिंपरी – चिंचवड शहरातील सर्वात आद्य शासकीय पुरस्कारविजेते आहेत, ही निश्चितच भूषणावह बाब आहे. त्यानंतर दहा कथासंग्रह, कादंबरी, कविता, वैचारिक लेखन करीत आजही त्यांची लेखणी कार्यरत आहे!” अशी माहिती दिली. कांतीलाल जानराव आणि दाहर मुजावर यांनी बशीर मुजावर निर्मित ‘अडतीस मुलांची शाळा’ या चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया कथन करताना निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीते अशा सर्व आघाड्या त्यांनी एकट्याने कशा सांभाळल्या याविषयी रंजक किस्से सांगितले; तर रघुनाथ पाटील यांनी मुजावर यांच्या अकृत्रिम स्नेहाच्या विविध आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी उपस्थितांच्या आग्रहास्तव बशीर मुजावर यांनी हार्मोनियम, बासरी, तबला इत्यादी वाद्ये वाजवीत काही अभिजात गीतांचे सादरीकरण केले. या मैफलीत वसंत कुंभार, शोभा जोशी, हेमंत जोशी, आय. के. शेख, शामराव सरकाळे, कैलास भैरट यांनीही रंग भरले. रजिया मुजावर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अरुण परदेशी, मुरलीधर दळवी, रौफ मुजावर, शबाना मुजावर, तसरीन मुजावर, शाहरूल आणि बराक मुजावर यांनी संयोजनात सहकार्य केले. शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.