नाशिक, दि. 4 (पीसीबी) – नाशिक महानगरपालिकेतील शिक्षणाधिकारी सुनिता सुभाष धनगर (57) यांना 50 हजार तर लिपीक नितीन अनिल जोशी यांना 5 हजार रूपयाची लाच घेतल्यानंतर नाशिकच्या अॅन्टी करप्शन विभागाने त्यांना रंगेहाथ पकडलं होते. दरम्यान, सुनिता धनगर यांच्या घराची झडती घेतली असता मोठं घबाड अॅन्टी करप्शनच्या हाती लागले आहे. सुनिता धनगर यांच्या घरातून तब्बल 85 लाख रूपये कॅश आणि 32 तोळे सोनं सोपडलं आहे. ते एसीबीने जप्त केले आहे.
सुनिता धनगर यांच्या नावावर 2 फ्लॅट आणि एक प्लॉट देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे. धनगर ज्या फ्लॅटमध्ये रहावयास आहेत तो फ्लॅट थ्री बीएचके असून त्याची किंमत सुमारे दीड कोटी एवढी आहे. त्यांचा अडगाव येथे प्लॉट असून एक फ्लॅट टिळकवाडी तर दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे आहे. याबाबत नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी माहिती दिली आहे.
तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरी बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदरील संस्था तक्रारदार यांना सेवेत दाखल करुन घेत नव्हती.
तक्रारदार यांनी मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी सुनीता धनगर यांनी याबाबत पत्र देण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. सुनीता धनगर यांना तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर मनपा कर्मचारी नितीन जोशी यांनी सदर पत्र बनवण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपये लाच स्वीकारली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पोलीस अंमलदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने केली आहे