कर्नाटकातील लिंगायत समाजाचा कौल काँग्रेसला

0
299

बेंगळुरू, दि. ७ (पीसीबी) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणारी लिंगायत समाजाची मते कुणाच्या पारड्यात पडणार यावर कर्नाटकाचं राजकारण वळण घेते. लिंगायत समाजाची मते मिळविण्यासाठी काँग्रेस, जेडीएससह काँग्रेसने कंबर कसली आहे. यात काँग्रेसने बाजी मारल्याचे सध्याचं चित्र आहे. कारण कर्नाटकातील वीरशैव लिंगायत फोरम ने काँग्रेसला खुला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.

वीरशैव लिंगायत फोरमने पाठिंब्याचे पत्र काँग्रेसला दिले आहे. ‘लिंगायत वोट बँक’ला राज्यात फार महत्व आहे. १७ टक्के लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे. यामुळे लिंगायत समाजाचे बीएस येदियुरप्पा यांना भाजपने मुख्यमंत्री पदावरुन हटवल्यानंतर त्याच समाजाच्या बसवराज बोम्मई यांना भाजपनं मुख्यमंत्रीपदी विराजमान केले.

राज्यातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली लिंगायत समाज आहे. हा समाज गेल्या 100 वर्षांपासून काँग्रेसशी जुळलेला आहे. 1924 मध्ये बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. तेव्हापासून हा समाज काँग्रेसच्या मागे आहे. 1924 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. तेव्हापासून ते तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींपर्यंत सर्वांनी लिंगायत समाजाला सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. 1956 मध्ये कर्नाटकचे एकीकरण झाल्यानंतरही 1969 मध्ये पक्षाचे विभाजन होईपर्यंत लिंगायतांचे वर्चस्व होते.

कर्नाटकात सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या प्रयत्न करीत आहे, तर काँग्रेस आणि जेडीएस सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. कर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी लिंगायत समाजाचे महत्व खूप मोठे आहे. कर्नाटकात प्रभावशाली लिंगायत समाजाची मते काँग्रेसच्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. मुंबई-कर्नाटक म्हणजेच आताचा कित्तूर हा भाग लिंगायतांचा बालेकिल्ला आहे. ज्यामध्ये 56 विधानसभा जागा आहेत आणि गेल्या दोन दशकांमध्ये भाजपच्या विजयात हा प्रमुख घटक आहे.

लिंगायत समाजातील प्रभावशाली नेता व माजी मुख्‍यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे काँग्रेस या ठिकाणी आपली शक्ती खर्च करत आहे. भाजप लिंगायत समाजातील प्रभावशाली नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. जे भाजपमधून बाहेर पडले आहे, त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.कर्नाटकात १० मे रोजी मतदान होत असून १३ मे रोजी निकाल लागणार आहे. यासाठी ५८ हजार २८२ मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाने यासाठी जोरदार तयारी केली आहे