जेष्ठ दंत शल्यविशारद डॉ.यशवंत इंगळे लिखित “फर्स्ट जून चाईल्ड” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.पी.डी.पाटील यांचे हस्ते

0
324

मुंबई, दि. २(पीसीबी)- जेष्ठ दंतशल्यविशारद डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेल्या “ग्रंथाली”ने प्रकाशित केलेल्या” फर्स्ट जून चाईल्ड ” या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. अलीकडच्या काळात प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताणतणाव वाढत आहते, विशेष म्हणजे तरुण मंडळींमध्ये त्याचे प्रमाण सर्वाधिक प्रमाणात दिसत आहे. यामधून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी आत्मकथने ही खूपच प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात, डॉ. यशवंत इंगळे यांच्या जीवनात संस्कार, संगत आणि शिक्षण या तीन गोष्टींचा सुंदर मिलाप या पुस्तकात होत आहे असे मत डॉ. डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी पाटील यांनी व्यक्त केले.

जेष्ठ दंतशल्यविशारद डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेल्या “ग्रंथाली”ने प्रकाशित केलेल्या ” फर्स्ट जून चाईल्ड ” या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजशेखर अय्यर, सकाळ समूहाचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी, मुंबई दूरदर्शनचे माजी उपसंचालक भगवंत इंगळे, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. लतिका भानुशाली आदी मान्यवर उपस्थित होते.

आत्मकथने ही व्यक्तिमत्व घडवण्याचे काम करीत असतात. त्यामुळे तरुण मंडळींच्या बरोबरच आबालवृद्धांनी देखील त्याचे वाचन करणे फायदेशीर ठरणारे आहे. डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेल्या फर्स्ट जून चाईल्ड या पुस्तकात त्यांनी आतापर्यंत केलेल्या यशाचा प्रेरकप्रवास वर्णन करण्यात आला आहे. जन्मतारीख काय हे माहीत नसतानाही आणि घरची गरिबीवर मत करुन जिद्द, चिकाटी आणि मेहनत या जोरावर डॉ. इंगळे यांनी मिळवलेले यश हे आजच्या तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी ठरणार असल्याचे डॉ. पाटील यावेळी म्हणाले.

मराठी साहित्यामध्ये अनेक नवे साहित्य सातत्याने येत असते. त्यामध्ये डॉ. यशवंत इंगळे यांनी लिहिलेले हे पुस्तक विशेष करून तरुण मंडळींना यशाचा मार्ग मिळवून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आपण जे घडतो, आपल्या आयुष्याला जो आकार मिळतो, त्यामध्ये वाचन आणि साहित्य याचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे आपण साहित्याच्या प्रवाहापासून दूर न जाता कायम त्याच्या सोबत राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.

बऱ्याचदा आत्मकथनाच्या पुस्तकांच्याकडे त्या व्यक्तीचे अनुभव म्हणूनच पहिले जाते. पण त्याकडे तसे न पाहाता आपले आयुष्य घडवण्यासाठी त्या मधल्या कोणत्या गोष्टी आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकतील, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. प्रत्येकाला व्हाट्सअप आणि फेसबुक वर रमण्याची सवय लागलेली आहे. ती जपतानाच त्यांनी वाचनाची गोडी देखील लावून घ्यायला हवी, असे डॉ. राजशेखर अय्यर यांनी यावेळी नमूद केले.

आत्मकथनाच्या पुस्तकामधून घेण्यासारखे खूप असते. त्यामुळे अशी पुस्तके वाचल्यानंतर त्यामधील कोणत्या गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त आहेत. याचा विचार करताना त्याचे अवलोकन करून त्या जर प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला तर भविष्य घडवण्यासाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, असे जोशी यावेळी म्हणाले.

आपले आयुष्य घडत असताना आलेले अनुभव, शिक्षण घेत असताना उभे राहिलेले प्रश्न, डॉ. डी वाय पाटील विद्यापीठात पदव्यूत्तर अभ्याक्रमासाठी प्रवेश मिळवताना आलेला अनुभव डॉ. यशवंत इंगळे यांनी यावेळी सांगितले. ग्रंथालीच्या विश्वस्त डॉ. ललिता भानुशाली यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे असणारी प्रकाशकांची भूमिका विशद केली. सुदेश हिंगलासपूरकर यांनी ग्रंथालीकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची यावेळी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खरे यांनी केले.